शहरी गरीब याेजनेतील लाभार्थीं खरेच गरीब आहेत का ?; लाभार्थींपैकी ६३२ जणांच्या नावाने मिळकती असल्याची माहीती समोर

-अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती

    पुणे : महापालिकेच्या आराेग्य विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या शहरी गरीब याेजनेतील लाभार्थीं खरेच गरीब आहेत का ? याची पडताळणी महापालिकेने सुरू केली आहे. गेल्यावर्षीच्या लाभार्थींपैकी ६३२ जणांच्या नावाने मिळकती असल्याची माहीती पुढे आली आहे.

    महापालिकेच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचारासाठी शहरी गरीब याेजनेतंर्गत आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआराेग्य याेजना आणि पंतप्रधान आयुष्यमान भारत याेजनेतंर्गतही वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य दिले जाते. यासर्व याेजनांचा आढावा घेण्यात आला आहे. यासंदर्भात अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी पत्रकारांना माहीती दिली. त्या म्हणाल्या, ‘‘ गेल्यावर्षी शहरी गरीब याेजनेचा सुमारे १२ हजार नागरीकांनी लाभ घेतला. या लाभार्थींची आर्थिक परीस्थिती खरच हलाखीची आहे का ? त्यांच्या नावावर मिळकती आहेत का याचा शाेध घेतला जात आहे. तसेच पुढील काळात संबंधित नागरीकांच्या पत्नीच्या नावे काही मिळकती आहेत का ? याची पडताळणी केली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. लाभार्थीपैकी ६३२ जणांच्या नावाने मिळकती असल्याचे आढळून आले आहे. त्यांना नाेटीस पाठविली जाणार आहे. ’’

    राज्य सरकारची महात्मा फुले जनआराेग्य याेजना आणि केंद्र सरकारची पंतप्रधान आयुष्यमान भारत याेजनेसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. यामध्ये आयुष्यमान भारत याेजनेचे केवळ सव्वा लाख कार्ड धारक असुन, त्यांची संख्या वाढविण्याचे आदेश क्षेत्रीय कार्यालयांना दिले गेले आहेत. प्रत्येक महीन्याला एक लाख कार्ड धारकांची नाेंद करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याची माहीती अग्रवाल यांनी दिली. या दाेन्ही शहरातील अकरा रुग्णालयात लागू आहे. या अकरा रुग्णालयांतही शहरी गरीब याेजना लागू करण्यात येणार आहे असेही त्यांनी नमूद केले.