ज्येष्ठांसाठी आणखी दोन क्लिनिकची व्यवस्था करणार ; पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा निर्णय

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सकाळपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षापुढील नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. लस केंव्हा मिळेल.किती वाजता मिळेल. अशी विचारणा देखील हे नागरिक वारंवार सुरक्षा रक्षकांकडे तसेच रुग्णालय प्रशासनाकडे करत आहेत.

    पुणे :  ज्येष्ठ नागरिकांना लस वेळेत मिळावी. याकरीता पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातर्फे आणखीन दोन क्लिनिकची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच लशीच्या उपलब्धतेनुसार दिवसाला साधारणतः दीडशे ते दोनशे ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. विशेष म्हणजे कॅन्टोन्मेंटच्या हद्दीतील ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. अशी माहिती पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्याधर गायकवाड यांनी दिली.

    पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सकाळपासून ज्येष्ठ नागरिक तसेच ४५ वर्षापुढील नागरिक लस घेण्यासाठी रांगा लावत आहेत. लस केंव्हा मिळेल.किती वाजता मिळेल. अशी विचारणा देखील हे नागरिक वारंवार सुरक्षा रक्षकांकडे तसेच रुग्णालय प्रशासनाकडे करत आहेत. परंतू, ज्येष्ठ नागरिकांकडूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन फारसे होताना दिसत नाही. तरीही लस घेण्यासाठी नागरिक आवर्जून उपस्थित राहत आहेत.

    डॉ.विद्याधर गायकवाड म्हणाले की, बुधवारी (ता.१९) आमदार सुनील कांबळे यांच्यासह बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांच्यासमवेत चर्चा झाली. त्यानुसार दोन क्लिनिकची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जास्त वेळ रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालनही होऊ शकेल. लस उपलब्ध होण्यानुसार लसीकरण केले जाते. काही वेळेला दिवसाला तीनशे ते चारशे नागरिकांना सुद्धा लस देण्यात येते. मात्र, सध्या दीडशे ते दोनशे नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.