वायसीएम रूग्णालयात २४ तास फिव्हर क्लिनिकची व्यवस्था…

    पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृति रूग्णालयात कोविड संशयित आणि कोविड बाधित रुग्णांसाठी सुसज्ज फिव्हर क्लिनिकची व्यवस्था केली आहे. ताप, अंगदुखी, खोकला तथा कोरोना आजाराची इतर लक्षणे असणा-या रुग्णांना प्रथमत: येथिल फिव्हर क्लिनिक मधील डॉक्टरांमार्फत तपासले जाते. येथे चोवीस तास तपासणी केंद्र सुरू केले आहे. पहिल्या कोरोना लाटेते 22 हजार 781 रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार झाले असून त्यापैकी 21 हजार 739 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली आहे.

    कोरोनाचा प्रादूर्भाव वाढू लागल्याने वायसीएम रुग्णालय कोवीडसमर्पित घोषित करण्यात आले आहे. कोविड संशयित रुग्णांची तत्काळ अ‍ॅटिजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करण्याची सुविधा वायसीएममध्ये उपलब्ध आहे. यशवंतराव चव्हाण रुग्णालयाची आरटीपीसीआर प्रयोगशाळा आणि महापालिका यंत्रणा कार्यरत आहेत. रुग्णालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत संशयित तथा बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांचे समुपदेशन करण्याकरीता स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.

    रुग्णालयात सद्यस्थितीत रुग्णांची गर्दी असून सबंध कर्मचारी वर्ग, डॉक्टर्स व इतर स्टाफ रुग्णसेवा करीत आहेत. रुग्णालयात कोविड संशयित 109 आणि कोविड बाधित 508 रूग्ण आहेत. तसेच ऑक्सिजन बेड 360, आयसीयु व्हेंटिलेटर बेड 71 उपलब्ध असून सद्यस्थितीत हे पूर्णपणे भरलेले आहेत. कोविडच्या पहिल्या लाटेपासून आजपर्यंत 22 हजार 781 आंतररुग्णांवर या रुग्णालयामार्फत उपचार केले आहेत. त्यापैकी 21 हजार 739 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

    रुग्णालयात येणा-या कोविड बाधित रुग्णांसाठी चोवीस तास स्वतंत्र प्राथमिक तपासणी कक्ष तयार केला आहे. कोविड बाधित रुग्णांची तपाणी करून रुग्णांच्या लक्षणानुसार उपचार केले जातात. अस्वस्थ रुग्णांना ऑक्सिजन देण्याची व्यवस्था केली आहे. कोविड बाधित असून मात्र लक्षणे सौम्य आहेत अशा रुग्णांना गृहविलगीकरणासाठी समुपदेशन देखील केले जात आहे.

    वायसीएममध्ये कोविड रुग्णांसाठी आवश्यक असणारी सर्व उपचार प्रणाली मोफत उपलब्ध असून गरजू रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था आहे. यासाठी रक्तदान, प्लाझ्मादान आणि प्लाझ्मा विलगीकरणाची चोख व्यवस्था यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढीत केली आहे, असेही डॉ. राजेंद्र वाबळे यांनी स्पष्ट केले.