अवैधरित्या सावकारी करणाऱ्या सावकाराला अटक; खंडणी विरोधी पथकाची कारवाई

शहरात सावकारकीच्या माध्यमातून सर्व सामान्य व गरीब नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार शहरात सुरू आहे. वाहने, कोरे चेक, सोने घेऊन तसेच जागा नावावरकरून पठाणी व्याजाने पैसे दिले जात असल्याचे समोर आलेले आहे.

    पुणे : दरमहिन्याला १० टक्के व्याज घेणाऱ्या सावकाराला अन त्याच्या साथीदारांना पुणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे. तो अडीच लाख रुपयांची खंडणी घेण्यासाठी आला होता. त्यावेळी ही कारवाई केली आहे. ज्ञानेश्वर किसन पवार (वय ४२, रा. वैदूवाडी) व साथीदार ओंकार संदिप तिवारी (वय २३, रा. कोंढवा) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    शहरात सावकारकीच्या माध्यमातून सर्व सामान्य व गरीब नागरिकांची पिळवणूक केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकार शहरात सुरू आहे. वाहने, कोरे चेक, सोने घेऊन तसेच जागा नावावरकरून पठाणी व्याजाने पैसे दिले जात असल्याचे समोर आलेले आहे. त्यामुळे पुणे पोलीसांकडून अशा बेकायदा सावकारी करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यादरम्यान, यातील तक्रारदार हे घरांचे पीओपी करणारे कामगार आहेत. ते परराज्यातील आहेत. त्यांना पैशांची आवश्यकता होती. त्यावेळी त्यांना ज्ञानेश्वर पवार हा व्याजाने पैसे देत असल्याचे समजले. तो नियमानुसार व्याज देत असेल यामुळे त्यांनी त्याच्याकून १ लाख ९५ हजार रुपये पैसे घेतले होते. नियमानुसार त्यांनी २ लाख ४५ हजार रुपये परत देखील केले. पण, त्याने १० टक्के प्रतिमहिना याप्रमाणे अवास्तवी मागणीकरून तसेच त्यांच्याकडून जबरदस्तीने ४ लाख ४५ हजार रुपये घेतले होते. तरीही तो त्यांना व्याजाच्या पैशांची मागणी करत होता. याबाबत त्यांनी पुणे पोलीसांच्या खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी करण्यात आली. त्यानुसार, आज २५ हजार रुपये खंडणी घेताना सावकर ज्ञानेश्वर पवार व त्याच्या साथीदाराला पोलीसांनी रंगेहात पकडले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखलकरून त्यांना अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, उपनिरीक्षक विजय झंझाड, श्रीकांत चव्हाण, कर्मचारी संपत अवचरे, सुरेंद्र जगदाळे, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंखे व त्यांच्या पथकाने केली आहे.