वृद्धाचा खून करुन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाला अटक

कटगी यांचा फुगेवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गालगत निर्घृण खून करण्यात आला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळून आला नाही.

    पिंपरी:  पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वृद्धाचा निर्घृण खून केला. त्यानंतर वृद्धाचा मोबाईल फोन व रोकड घेऊन परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एकाला भोसरी पोलिसांनी अटक केली. फुगेवाडी येथे हा खून घडला होता. रामन्ना गोपाल कटगी (वय ६८, मूळ रा. निरगुंडी, कर्नाटक), असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे. सोमनाथ म्हेत्रे असे अटक आरोपीचे नाव आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कटगी यांचा फुगेवाडी येथे पुणे-मुंबई महामार्गालगत निर्घृण खून करण्यात आला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणत्याही प्रकारचा पुरावा मिळून आला नाही. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, आरोपी आणि कटगी यांची यापूर्वी भांडण झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी सोमनाथ हा रबाळे, ठाणे येथे असून रेल्वेने परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ठाणे येथून आरोपीला ताब्यात घेतले.

    आरोपी हा फिरस्ता व बेघर असून त्याच्याकडे उपजिवीकेचे साधन नाही. त्याची उपासमार होत असल्याने तसेच कटगी यांच्यासोबत झालेल्या वादाचा आरोपीच्या मनात राग होता. त्या कारणावरून कटगी यांचा खून केला. आरोपीने गुन्हा केला असल्याची कबुली दिली. भोसरी पोलिसांनी खून झाल्यानंतर बारा तासांत आरोपीला ताब्यात घेतले.