तीर्थक्षेत्र ओझरच्या मंदिरावर दरोडा घालणाऱ्यांना अटक

तीन आरोपी फरार
जुन्नर: अष्टविनायक तीर्थक्षेत्र ओझर येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री चोरून नेणाऱ्या दोन दरोडेखोरांना आळेफाटा पोलिसांनी पहाटे बेल्ह्याजवळ दरोडा टाकताना रंगेहाथ पकडले. तीन आरोपी फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आळेफाटा पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ही कारवाई केली. आरोपींकडून दुचाकीसह चॅापर, कोयता, पहाने, कटावणी असे दरोडा घालण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केले आहे. विठ्ठल पतवे (वय ४७) आणि सोन्या पतवे (वय २७) दोघेही. रा. अकोले या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अन्य तिघांचा शोध सुरू आहे. ही माहिती आळेफाटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

ओझरच्या विघ्नहर मंदिरातून २७ जुलैला साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी पळवून नेली होती. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडून रक्कम लांबवली होती. ही चोरी देखील याच आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाले असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपींना ओतूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, अशी माहिती मुजावर यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ ऑगस्टच्या पहाटे तीनच्या सुमारास मंगरूळ- झापवाडी रस्त्यावर आळेफाटा पोलिसांचे गस्ती पथक कारने जात असताना, हनुमान मंदिरापासून काही अंतरावर त्यांना वस्तीवर ग्रामस्थांची गर्दी दिसली. तत्पूर्वी दोन दुचाकींवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी एका घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी दुसऱ्या बाजूने पोलीस गस्ती वाहन येत असल्याचे समजताच, दोन दरोडेखोर एका दुचाकीवरून हनुमान मंदिराच्या मागे जाऊन लपले. तेव्हा गर्दीतील ग्रामस्थांनी दरोडेखोर कोणत्या बाजूने गेले हे पोलिसांना सांगितल्याने पोलिसांनी जंगलाच्या बाजूने माग काढला. तेव्हा झाडामागे लपून बसलेल्या दोघांना पोलीस पथकाने रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून दरोडा टाकण्यासाठी आणलेले साहित्य जप्त केले. मात्र अन्य तीन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन दुसऱ्या दुचाकीवरून फरार झाले. मुजावर यांच्यासह, फौजदार सतीष डौले, हवालदार गोरक्ष हसे, वाय. एस. मोमीन, पी. एन. फड, होमगार्ड बाळा शिरतर यांनी दरोडेखोरांना रंगेहाथ पकडले.

विघ्नहर मंदिरात कडेकोट सुरक्षा
चोरीच्या घटनेनंतर विघ्नहर मंदिरात सुरक्षेच्या उपाययोजना केल्या आहेत. मंदिरात दोन, मंदिराच्या ओवरीवर दोन, तर मंदिराबाहेरील परिघात चार असे आठ सुरक्षारक्षक रात्री तैनात ठेवले आहेत. मंदिरातील प्रवेशाच्या तीनही दरवाजांना मिळून ६ अत्याधुनिक सायरन देखील बसवण्यात आले आहेत. तर रोज रात्री पोलीस गस्तीचे वाहन दोन ते तीन वेळा गस्तीसाठी मंदिर परिसरात येत असून, संपूर्ण खबरदारी घेतली जात आहे.