खोटे सोन्याचे दागिने विकणारा जेरबंद

आव्हाळवाडीतील घटना
वाघोली : आव्हाळवाडी येथील एका व्यक्ती जवळ जाऊन त्याचा विश्वास संपादन करून आव्हाळवाडी येथील एकाला अर्धा किलो सोन्याचे खोटे दागिने खरे असल्याचे सांगून ते दागिने देऊन ४ लाख ७१ हजार रुपये घेऊन पसार झालेल्या एका व्यक्तीस लोणीकंद पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पकडले असून त्याच्याकडून इतर सोन्याचे खोटे दागिने जप्त करण्यात आले आहे. गोविंद उर्फ मारुती रामनाथ आंधळे (वय, ३४) रा. आव्हाळवाडी, मूळगाव आष्टी, जि बीड) असे खोटे दागिने विकणाऱ्याचे नाव आहे.

– बनावट दागिने दाखवून लोकांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आव्हाळवाडी येथील ५८ वर्षीय व्यक्तीस गोविंद आंधळे याने विश्वास संपादन करून त्याच्याकडील सुमारे अर्धा किलो खोटे सोने खरे असल्याचे सांगून दागिन्यांच्या बदल्यात ४ लाख ७१ हजार रुपये घेऊन फसवणूक केली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तपास करीत असताना आव्हाळवाडी गाव परिसरात कमी किंमतीत सोन्याचे खोटे बनावट दागिने दाखवून लोकांची फसवणूक करत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने आंधळे यास अटक केली. त्याच्याकडे असणाऱ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सोन्यासारखी पॉलिश असलेले बनावट दागिने मिळून आले. सदर कारवाई हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंद चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हणमंत पडळकर आणि त्यांच्या टीमने केली आहे.