१६ लाखाचे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागीराला हैदराबाद मधून अटक

दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिराला गुन्हे शाखेने हैदराबाद येथून अटक केली. या प्रकरणी अभिजित घोरपडे (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती.

पुणे: सराफ व्यावसायिकाकडून १६ लाख १५ हजार रुपयांचे दागिने घेऊन पसार झालेल्या कारागिराला(Artisan )गुन्हे शाखेने हैदराबाद येथून अटक केली. रविवारी कारागीर पसार झाल्याचे समोर आले होते.अकबर ऊर्फ अतर रफीक मलिक (वय ३६ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अभिजित घोरपडे (रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली हाेती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित हे सराफ व्यावसायिक असून, ते ऑर्डरप्रमाणे सोन्याचे दागिने बनवून देतात. त्यांच्याकडील सोने घेऊन दागिने(jewelery) बनविण्याचे काम अकबर काही महिन्यांपासून करीत होता. त्यामुळे अभिजितचा अकबरवर विश्वास होता. काही महिन्यांपूर्वी अकबरने दागिने बनविण्याच्या हेतूने अभिजित यांच्याकडून ३२३ ग्रॅम वजनाचे दागिने घेऊन परत न देता १६ लाख १५ हजारांची फसवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलीस करत होते.

यावेळी गुन्हे शाखा युनिट दोनचे गजानन सोनुने व कादीर शेख आरोपी अकबरची माहिती काढत होते. त्यात तो हैदराबाद येथे असल्याची माहिती समजली. त्यानुसार गुन्हे शाखेने त्याला सिकंदराबाद (हैदराबाद)(Hyderabad) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई अपर आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंग, सहायक आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश मोरे, किशोर वग्गु, महाजन, गजानन सोनुने, कादीर शेख, निखिल जाधव, समीर पटेल यांच्या पथकाने केली आहे.