मलठणचे कोविड सेंटर नावापुरतेच?

पंचायत समिती सदस्य,शिरूर डॉ.सुभाष पोकळे यांचा सवाल 

कवठे येमाई :  शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात मलठण येथे शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून ग्रामीण उपजिल्हा रुग्नालय उभारले असून सध्या या भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे सुरु करण्यात आलेले कोविड सेंटर डॉक्टर,व्हंटीलेटर व इतर अत्यावश्यक सुविधां अभावी नावापुरतेच काय ? व्हंटीलेटर साठी मोठी यंत्रणा प्रशासनास संबंधीत कोविड सेंटर मध्ये उभी करावी लागणार असली तरी लोकांच्या जिवापेक्षा मोठे काय ? असा संतप्त सवाल शिरूर पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे यांनी केला आहे

.मलठण,कवठे येमाई व शिरूर पश्चिम परिसरातील कोरोना ग्रस्तांना दिलासा मिळावा म्हणून शासनाने मलठणला कोविड सेंटर सुरु केले ही बाब नक्कीच स्वागतार्ह आहे. जिल्ह्यात अनेक कोरोना पॉझिटिव्ह व सदृश्य लक्षणे दिसणारे रुग्ण यांना वेळेत व्हॅटीलेटर सुविधा उपलब्ध न झाल्याने दगावल्याचे निदर्शनास आले असताना मलठण येथील कोविड सेंटरला अद्यापही कायमस्वरूपी डॉक्टर,व्हॅटिलेटर व इतर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याची खंत डॉ.पोकळे यांनी व्यक्त केली आहे. परिसरातील खाजगी डॉक्टरांची नियुक्ती मलठण कोविड सेंटरला केल्याची माहिती मिळत असून तेच खाजगी डॉक्टर कोविड सेंटरमध्ये काम करीत असताना स्वतःची खाजगी दवाखाने ही चालवत आहेत. जर या डॉक्टरांपैकीच एखादा डॉक्टर बाधित झाला तर त्याचा परिणाम त्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे उपचारासाठी येणारे इतर रुग्ण यांना ही बाधीत ठरू शकतो म्हणून येथील कोविड सेंटरमध्ये कायमस्वरूपी खास कोविड सेंटरसाठी स्वतंत्र वैद्यकीय अधिकाऱ्याची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी डॉ.सुभाष पोकळे यांनी केली आहे.डॉ.भगवान पवार – जिल्हा आरोग्य अधिकारी,पुणे मलठण कोविड सेंटरला कायमस्वरूपी स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी,व्हँटीलेटर व इतर अत्यावश्यक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी,दक्षता घेण्याची गरज आहे.