आमदार महेश लांडगे यांनी लक्ष घालताच पाच वर्षांपासून रखडलेला धोकादायक वीजवाहिन्यांचा प्रश्न अखेर मार्गी

महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना तातडीने या वीजवाहिन्या भूमिगत करून द्याव्यात आणि विजेचे खांब बदलण्यात यावे, अशी सूचना केली. महत्त्वाचे म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी तीनशे मीटर केबल स्वनिधीतून तातडीने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली.

    पिंपरी: रुपीनगर-तळवडे या भागात महावितरणकडून टाकलेल्या वीजवाहिन्या उघड्या पडल्या होत्या. तसेच, वीज खांबांचीही दुरावस्था झाली होती. पाच वर्षांपासून हा प्रश्न रखडलेला होता. नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. निवेदने सादर केली. मात्र, हा प्रश्न सुटला नाही. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या कानावर नागरिकांनी ही तक्रार घातली. नागरिकांचा हा प्रश्न गांभीर्याने घेत लांडगे यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या आणि अवघ्या काही दिवसांत नागरिकांचा हा प्रश्न मार्गी लागला. यामुळे या भागात राहणाऱ्या तब्बल तीन हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

    रुपीनगर-तळवडे या भागातील संगम व विकास हाउसिंग सोसायटी या परिसरात असणाऱ्या उघड्या विजेच्या तारा तसेच दुरावस्था झालेले विजेचे खांब यामुळे मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न नागरिकांच्या जीवावरदेखील बेतू शकत होता. पावसाळा किंवा वादळी वारा यासारख्या आपत्तीमध्ये नागरिकांच्या डोक्यावर अक्षरशः टांगती तलवारच यानिमित्ताने होती. हा प्रश्न सुटावा, या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात याव्यात. तसेच विजेचे खांब बदलून देण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होती. नागरिकांच्या या मागणीसाठी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी यासाठी पाठपुरावा केला. मात्र, महावितरणच्या अनास्थेमुळे हा प्रश्न रेंगाळला होता.

    या भागाच्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी आमदार महेश लांडगे आले असता येथील नागरिकांनी ही बाब त्यांच्या कानावर घातली. आमदारांनी प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरू केल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांना तातडीने या वीजवाहिन्या भूमिगत करून द्याव्यात आणि विजेचे खांब बदलण्यात यावे, अशी सूचना केली. महत्त्वाचे म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी तीनशे मीटर केबल स्वनिधीतून तातडीने नागरिकांसाठी उपलब्ध करून दिली.यामुळे नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लागला आहे. या कामासाठी माजी नगरसेवक शांताराम भालेकर , शहर उपाध्यक्ष किरण पाटील स्वीकृत नगरसेवक पांडुरंग भालेकर , सामाजिक कार्यकर्ते धनंजय वर्णेकर , अस्मिता भालेकर, शितल वर्णेकर, रमेश भालेकर, सागर चव्हाण, रामदास कूटे, हनुमंत जाधव, दत्ता खरे, रवी शेत संधी, रफिक नदाफ यांच्या उपस्थितीत भूमिगत वाहिन्यांसाठी केबल सुपूर्त करण्यात आली.

    रुपीनगर-तळवडे येथील वीज समस्येवर केबल बदलणे हाच एकमेव उपाय आहे. हे लक्षात आल्यावर माझ्या स्वखर्चाने नवीन केबल तळवडे मधील ग्रामस्थ व महावितरणचे अधिकारी यांना उपलब्ध करून दिली यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

    - महेश लांडगे, शहराध्यक्ष व आमदार, पिंपरी-चिंचवड.