पिंपरी चिंचवड़ महापालिका आयुक्त रजेवर जाताच बदलीच्या चर्चेने धरला जोर

स्वच्छ भारत स्पर्धेत पिंपरी महापालिकेची झालेली घसरण, स्मार्ट सिटीतील करोडोंचा घोटाळा, प्रशासनातील अंतर्गत वाद, कोरोना महामारीतील कोट्यवधींची थेट खरेदी, वाकडच्या रस्ते विकासावरुन उडालेले खटके, एफडीआर – बँक हमी घोटाळा, बॉयो – मेडिकल वेस्ट निविदा, कचरा संकलन आणि वहन निविदा आणि दिवसाआडचा पाणीपुरवठा यांमुळे आयुक्तांच्या अडचणीत वाढ होवू लागली आहे.

पिंपरी: चिंचवड़ महापालिका आयुक्त रजेवर जाताच बदलीच्या चर्चेने धरला जोर पिंपरी चिंचवड महापालिकेतील नियुक्ति चा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आयुक्त श्रावण हर्डीकर रजेवर गेले आहेत. यामुळे त्यांच्या बदलीच्या चर्चेला पुन्हा एकदा जोर आला आहे. भाजपच्या एका आमदाराने त्यांच्या निरोप समारंभाची तयारीही केली आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक करणारी चित्रफित तयार केली जात आहे. त्यामुळे या आठवड्यात आयुक्तांची बदली होईल, अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, १ जानेवारी २०२१ रोजी आयुक्तांना सचिवपदी बढती मिळणार आहे. बढती आणि बदली एकाचवेळी होण्याची शक्यता आहे. २७ एप्रिल २०१७ रोजी हर्डीकर यांनी आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतला होता. महापालिकेतील पावणे चार वर्षांची कारकिर्द वादग्रस्त राहिली. भाजपचे दलाल, भाजप आमदारांचे घरगडी, भाजप प्रवक्ते अशी शेलकी विशेषणे त्यांना चिकटत गेली. भाजप पक्ष कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्षांची घेतलेली भेट आणि केलेले गुफ्तगु यांमुळे तर ते शहरवासियांच्याही टीकेचे धनी ठरले.

‘स्मार्ट सिटी’ तील अनागोंदी, एफडीआर – बँक हमी घोटाळा, महापालिकेतील वाढता भ्रष्टाचार आणि भाजप धार्जिणे आरोपांमुळे श्रावण हर्डीकर यांची प्रतिमा डागाळली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप – महेश लांडगे यांच्याभोवती फिरण्यातच त्यांचा बराचसा कालावधी गेला. त्यामुळे त्यांना शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधकांनी धारेवर धरले. भाजपधार्जिणे असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी वेळोवेळी केली.

राज्यातील राजकीय समीकरण बदलून महाविकास आघाडीकडे सत्ता आली. सत्ता येताच त्यांची बदली होईल असे बोलले जात असताना कोरोना महामारी आली. संकटाच्या काळात सरकारने अधिका-यांच्या बदल्या केल्या नाहीत. त्यामुळे तीन वर्षांची मुदत संपल्यानंतरही त्यांना मुदतवाढ देण्यात आली. कोरोना काळात आयुक्तांनी चांगली कामगिरी केली. मात्र राज्यातील समिकरणे बदलल्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनीही आपल्या भूमिकेत बदल केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप पदाधिकारी आयुक्तांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेवू लागले.

स्वच्छ भारत स्पर्धेत पिंपरी महापालिकेची झालेली घसरण, स्मार्ट सिटीतील करोडोंचा घोटाळा, प्रशासनातील अंतर्गत वाद, कोरोना महामारीतील कोट्यवधींची थेट खरेदी, वाकडच्या रस्ते विकासावरुन उडालेले खटके, एफडीआर – बँक हमी घोटाळा, बॉयो – मेडिकल वेस्ट निविदा, कचरा संकलन आणि वहन निविदा आणि दिवसाआडचा पाणीपुरवठा यांमुळे आयुक्तांच्या अडचणीत वाढ होवू लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी लोकप्रतिनिधींशी सातत्याने संघर्ष होवू लागला आहे. आरोप – प्रत्यारोपांच्या फैरीमुळे हर्डीकर अधिकच बेजार झाले आहेत.

आगामी महापालिका निवडणुकीत आपल्याला अधिक लक्ष्य केले जाईल, याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळेच निवडणुकीपुर्वीच बदली व्हावी यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे समजते. आयुक्तांच्या मुंबईवाऱ्या वाढल्या आहेत. १जानेवारी२०२१ रोजी ते सनदी सेवेची १६वर्षे पूर्ण करत आहेत. त्याचदिवशी त्यांची सचिवपदी बढती होणार आहे. त्यामुळे आयुक्तांच्या बदलीच्या चर्चेने जोर धरला आहे. या आठवड्यात कधीही त्यांची बदली होईल अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ”१ जानेवारी रोजी आपली सचिवपदी बढती होणार आहे. बढती आणि बदली एकाचवेळी होईल, अशी अपेक्षा आहे”.