घरभाडे मागितल्याने घरमालकाच्या मुलाला थेट चौथ्या मजल्यावरूनच दिले ढकलून

मागील आठ महिन्यांचे घरभाडे थकले असल्याने ते मागण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा सौरभ गेले. पैसे मागितल्याचा राग आल्याने केले असे कृत्य.

    पिंपरी : आठ महिने भाडे थकल्याने भाडेकरू कुटुंबाकडे घरमालक आणि त्यांच्या मुलाने भाडे मागितले. त्यावरून भाडेकरू कुटुंबाने घरमालक आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर नेले. तसेच मुलाला चौथ्या मजल्यावरून ढकलून दिले. याबाबत भाडेकरू कुटुंबावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजता सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे घडली.

    विजय पाटोळे, त्याची पत्नी, मुलगी आणि साहिल विजय पाटोळे (सर्व रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत सचिन शिवदास पोरे (वय 50, रा. सुदर्शननगर, पिंपळे गुरव) यांनी गुरुवारी (दि. 2) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा मुलगा सौरभ या घटनेत जखमी झाला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुटुंब फिर्यादी यांच्या इमारतीमध्ये भाड्याने राहत आहे. मागील आठ महिन्यांचे घरभाडे थकले असल्याने ते मागण्यासाठी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा सौरभ गेले. पैसे मागितल्याचा राग आल्याने आरोपी कुटुंबाने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर बोलावले. टेरेसवर शिवीगाळ आणि धक्काबुक्की करून आरोपींनी सौरभला चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.