सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयास भोसरी, पिंपरीत गाळे देणार: ॲड. नितीन लांडगे

भोसरी रुग्णालयाच्या इमारती मागील जुन्या इमारतीमध्ये भोसरी परिसरातील पोस्ट ऑफीस आहे. पोस्ट ऑफीस असणारी हि इमारत मोडकळीस आली असून येथे येणा-या नागरीकांना गैरसोयीची आहे. त्यामुळे पोस्ट ऑफीससाठी देखिल नवीन भोसरी मंडईच्या प्रशस्त इमारतीत जागा उपलब्ध करुन द्यावी.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आता वेगाने स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून विकसित होत आहे. बांधकाम क्षेत्रात देखिल आता मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. त्यामुळे स्थावर मालमत्ता, खरेदी – विक्रीचे व्यवहारांचे प्रमाण देखिल दिवसेंदिवस वाढत आहे. नागरीकांना शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात मुद्रांक व दस्त, अभिलेख नोंदणीसाठी वेळोवेळी जावे लागते. पिंपरी चिचंवड महानगरपालिका हद्दीतील सहाय्यक निबंधकांची काही कार्यालये हि अडचणीच्या ठिकाणी व कमी जागेत आहेत. या कार्यालयांसाठी महानगरपालिकेच्या मालकीच्या इमारतीत जागा मिळावी अशी मागणी सह जिल्हा निबंधक वर्ग १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे यांनी मनपाकडे केली होती.

    या मागणीचा व उपलब्ध जागेचा विचार करुन भोसरी येथे बांधलेल्या नविन भाजी मंडईच्या इमारतीतील २००० स्वेअर फुट जागा; भोसरी स्पाईन रोड क्लब हाऊस येथील २००० स्वेअर फुट; पिंपरी गावात सुखवानी क्रिस्टल इमारतीत २००० स्वेअर फुट आणि औंध रावेत बीआरटी रोड ‘ड’ प्रभाग समोरील इमारतीत १८०६ स्वेअर फुट गाळा देण्याचा ठराव संमत करण्यात आला अशी माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिध्दीस दिली आहे.

    स्थायी समितीची ऑनलाईन बैठक अॅड. नितीन लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील शासनाच्या प्राप्त दरानुसार व नियमानुसार वाजवी भाडे आकारुन पाच वर्षांसाठी सह दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ७९ ‘ब’ नुसार मान्यता देण्यात आली आहे.

    तसेच भोसरी रुग्णालयाच्या इमारती मागील जुन्या इमारतीमध्ये भोसरी परिसरातील पोस्ट ऑफीस आहे. पोस्ट ऑफीस असणारी हि इमारत मोडकळीस आली असून येथे येणा-या नागरीकांना गैरसोयीची आहे. त्यामुळे पोस्ट ऑफीससाठी देखिल नवीन भोसरी मंडईच्या प्रशस्त इमारतीत जागा उपलब्ध करुन द्यावी अशीही मागणी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे. यावर आयुक्त पाटील यांनी केंद्र सरकारच्या पोस्ट खात्याच्या संबंधित अधिका-यांशी संपर्क करुन पुढील कारवाई करु असा सकारात्मक प्रतिसाद दिला. अशीहि माहिती पिंपरी चिंचवड मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी दिली.