यवत यादववाडी येथे बिबट्याच्या जोडीने २ शेळ्या केल्या फस्त, तर १ शेळी जखमी

    यवत : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील यवत यादववाडी येथील जनार्दन राजाराम यादव यांच्या घरासमोरील गोठ्यात असणाऱ्या शेळ्यांवर गुरुवार (दि.१५) पहाटेचे सुमारास एक बिबट्या मादी व तिच्या पिल्लाने हल्ला करत दोन शेळ्या मारून टाकल्या. मृत एक शेळीचा गळ्यातील दोर न तुटल्याने ती जागीच फेकून दुसरी शेळी शेतात ओढत नेली तर एक शेळी जखमी केली.
    यवत स्टेशन परिसरातील ही तिसरी घटना असून, शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी ही बाब आहे. अनेक शेतकऱ्यांचे उघड्यावर गोठे आहेत. त्यामुळे रात्र जागून काढण्याची वेळ यवत स्टेशन येथील शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे, भटके कुत्रे देखील गायब असल्याने या कुत्र्यांची शिकारसुद्धा या बिबट्याच्या जोडीने केल्याची चर्चा परिसरात आहे.
    याबाबत माहिती मिळताच यवत गावचे सरपंच समीर दोरगे व उपसरपंच सुभाष यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. यवत परिसरातील बिबट्याचा वाढता वावरामुळे भविष्यात मोठ्या जीवितहानीसाठी समोर जाण्याअगोदरच वनविभागाने तात्काळ पिंजरे लावून बिबट्याच्या जोडीला कैद करावे, अशी सरपंच समीर दोरगे यांनी मागणी केली. वनविभागाच्या वरिष्ठ कार्यालयास तात्काळ उपाययोजना करण्याबाबत ग्रामपंचायतीकडून पत्रव्यवहार करणार असल्याचे उपसरपंच सुभाष यादव यांनी सांगितले.
    यावेळी वनरक्षक सचिन पुरी यांनी घटनास्थळी भेट घेत पंचनामा केला. परिसरात बिबट्याकडून आतापर्यंत २ वर्षात ६ हल्ले त्यापैकी ७ दिवसात ३ हल्ले झाल्याने चिंता करण्याची बाब असून, सद्यस्थितीत पिंजरे उपलब्ध नसल्याने पिंजरे उपलब्ध होईपर्यंत सर्वांनी काळजी घेण्याची विनंती वनरक्षक सचिन पुरी यांनी केली.
    पूर्वी जंगलात राहणारा बिबट्या आता उसाच्या फडात राहू लागला आहे. जन्म आणि पुढील वावरही उसाच्या फडात असलेली बिबट्याची पिढी आता जंगल विसरते की काय, अशीच स्थिती झाली आहे. ऊस तोडला की हेच बिबटे गावात येऊन धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे केवळ जंगली आणि डोंगरी भागांत असलेले बिबटे आता अन्यत्रही दिसू लागले आहे. त्यांच्यापासून सुरक्षेसाठी आता नव्या उपाययोजना वनविभागाला कराव्या लागणार आहेत.