चोरीच्या पैशातून सावकारी करणारा अट्टल चोरटा जेरबंद; पाऊणकोटीचा मुद्देमाल जप्त

दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.

    पिंपरी: दिवसा बंद घरांची पाहणी करून रात्री घरफोड्या करणाऱ्या चोरट्याला चिंचवड पोलीसांनी जेरबंद केले. चोरीच्या पैशांतून सावकारी सुरू करणाऱ्याया अट्टल चोरट्याकडून ७७ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लखन अशोक जेटीथोर (वय ३२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळ – सोलापूर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले (वय ४२), सुरेश नारायण जाधव (वय ४२, दोघे रा. रहाटणी) यांना देखील अटक केली आहे. त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

    आरोपी लखन हा चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता. दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.
    वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडीच्या वारंवार घटना घडल्याने चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी परिसरात लक्ष केंद्रीत केले. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात एक संशयित व्यक्ती मास्क लावून जाताना दिसत असे. मात्र, एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावर तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून गायब होत असे. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती काढून ओळख पटवली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केले.

    लखन हा त्याचे साथीदार आरोपी रवी आणि सुरेश यांच्या मदतीने घरफोडी केलेला माल विकत असे. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक केली. वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडी केल्यावर लखन त्याचा मित्र कृष्णा जाधव याच्या घरी जाऊन झोपत असे. कृष्णा जाधव सध्या पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत लखनचा चोरीचा माल विकला गेला नाही. चोरीच्या पैशातून तो सावकारी करत असे. त्यातूनच त्याने एकाकडून फॉच्र्युनर मोटार जबरदस्तीने आणली होती. चोरी करून पैसे साठवून त्याला फ्लॅट घ्यायचा होता.

    लखन याच्यावर सन २००९ ते २०१२ या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नऊ गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून ७८ तोळे सोने, १० टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉच्र्युनर असा ७७ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, विश्वजीत खुळे, सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल, फौजदार नामदेव तलवाडे यांनी केली आहे.