प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नारायणपूर:पुरंदर तालुक्यातील आंबोडी येथे एका नवजात अर्भकाला जिवंत पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .सुदैवाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी हा प्रकार पाहिल्यानंतर हा प्रयत्न सोडून तरुणांनी पळ काढला .हे अर्भक आता सुरक्षित असून पोलिसांनी त्याला उपचारासाठी जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

याबाबत सासवड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ,आंबोडी येथील एका शेतामध्ये दोन तरुण शेतात खड्डा खणत होते .परिसरातील शेतात काम करणारे काही लोक या ठिकाणी आले असता, त्यांना याबाबत संशय आला .त्यामुळे त्यांनी लांबूनच त्यांना काय करताय ?हे विचारले, मात्र यानंतर त्यांनी तेथून दुचाकी घेऊन पळ काढला. मात्र जाताना अर्भक जागीच सोडून दिले. यानंतर नागरिकांनी सासवड पोलिसांना याबाबत माहिती दिली .यानंतर सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके तातडीने घटनास्थळी दाखल झाले .त्यावेळी साधारण दोन दिवसांचे जिवंत अर्भक असल्याचे दिसून आले .पोलिसांनी अर्भक ताब्यात घेतले असून त्याला जेजुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .येथील तपासणीनंतर या अर्भकाला पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे .याबाबतचा अधिक तपास सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके करीत आहेत.