पोलिसांनी कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाची आत्महत्या

शहरातील जनवाडी येथील जनता वसाहतीतील प्रकार पुणे : किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. मात्र, काही कारवाई न केल्याने ते येता जाता त्यांना टोमणे मारत होते. तुझ्या

शहरातील जनवाडी येथील जनता वसाहतीतील प्रकार

पुणे : किरकोळ कारणावरुन बेदम मारहाण केल्याची तक्रार पोलिसांनी दाखल करुन घेतली. मात्र, काही कारवाई न केल्याने ते येता जाता त्यांना टोमणे मारत होते. तुझ्या मुलाला व मानसिक आजारी असलेल्या मुलीला संपवितो, अशी धमकी देत होते. मारहाण करुनही पोलिसांनी काहीही कारवाई न केल्याने नैराश्येतून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. जनवाडी येथील जनता वसाहतीत मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.रामदास मारुती कुसाळकर (वय ५१, रा. धर्मनगर, सोमेश्वर मंदिराजवळ, जनवाडी) असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी विकी कुसाळकर याच्यासह ६ जणांना ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी कुसाळकर यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, रामदास कुसाळकर हे भाड्याने रिक्षा घेऊन चालवत होते. बाबु कुसाळकर यांचे धर्मनगरमध्ये ऑफिस आहे. तेथे ते बसत असत. ऑफिसमध्ये जाता येऊ नये, म्हणून कोणीतरी दारासमोर घाण टाकली होती. शनिवारी याबाबत बाबु याने विकी याच्याकडे विचारणा केल्यावर त्याने व त्याच्या साथीदारांनी बाबु, देवीदास व सागर यांना बेदम मारहाण केली. त्यांनी जनवाडी पोलीस चौकीत तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी दोघांवरच गुन्हे दाखल केले. परंतु, पुढे कोणतीही कारवाई केली नाही. दुसऱ्या दिवशी त्या टोळक्याने त्यांना जाता येताना पुन्हा चिडविण्यास सुरुवात केली. इतका सर्व प्रकार होऊन पोलिसांनी त्यांच्यावर काही कारवाई केली नाही. उलट ते आणखी चिडवू लागले. तसेच मुलाला व मुलीला संपवितो, अशी धमकी देऊ लागले. लॉकडाऊनमुळे घरी असल्याने त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला. मंगळवारी रात्री ते वरच्या खोलीत गेले. तेथे त्यांनी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ आतमध्ये असल्याने शेजारच्यांनी आवाज दिल्यावरही त्यांनी दरवाजा उघडला नाही. तेव्हा दरवाजा तोडून आत प्रवेश केला तर त्यांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले.याबाबत चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी सांगितले की, शनिवारी त्यांच्यात भांडणे झाल्यानंतर आम्ही गुन्हा दाखल केला होता. त्यात रामदास कुसाळकर हे यात फिर्यादी अथवा आरोपीही नव्हते. मात्र, त्यांचे नातेवाईक होते. यापूर्वी त्यांना, त्यांच्या मुलीला टोमणे मारले जात असल्याची तक्रार त्यांनी दिली नव्हती. याबाबत पोलिसांनी ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तसेच दारु विक्री सुरु झाल्यावर जनवाडी,गोखलेनगर भागात भांडणाच्या प्रकारात वाढ झाली आहे. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई केली जात नसल्याच्या तक्रारी आहेत.