क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची कारवाई अहमदनगर : जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या भूसंपादन विभागाच्या सहा कार्यालयांना मंगळवारी (दि.१६) सकाळी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने टाळे ठोकण्यात

क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांची कारवाई
अहमदनगर :
जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात असलेल्या भूसंपादन विभागाच्या सहा कार्यालयांना मंगळवारी (दि.१६) सकाळी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने टाळे ठोकण्यात आले. या कार्यालयांकडून वारंवार सूचना देवूनही भाडे न मिळाल्यामुळे क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी ही कारवाई केली होती.

या कारवाईमुळे एका शासकीय कार्यालयावर दुसऱ्या शासकीय कार्यालयाकडून झालेली कारवाई शहरासह जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. जिल्हा क्रीडा संकुलात विविध खेळांची मैदाने, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल याचबरोबर स्वच्छतागृहे काही भागात खेळाडूंच्या वसतीगृहासाठी सोय केलेली आहे. याच वसतीगृहाच्या जागेत गेल्या सहा वर्षापासून येथील भूसंपादन विभागाची सहा कार्यालये स्थलांतरित करण्यात आलेली आहेत. ही कार्यालये या ठिकाणी कशी स्थलांतरित करण्यात आली याची कुठे नोंदच आढळून आलेली नाही.

-६ वर्षांचे भाडे हे रेडी रेकनर दरानुसार देण्यात यावे
जिल्हा क्रीडा संकुलाच्या निर्मितीनंतर या संकुलाचे गेली १५ वर्षे ऑडिटच झालेले नव्हते. जेव्हा आपण जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून पदभार घेतला. तेव्हा आढावा घेताना ही बाब निदर्शनास आली, त्यामुळे क्रीडा संकुलाच्या कामकाजाचे ऑडिट करण्यात आले असता त्यात ज्या काही बाबी समोर आल्या. त्यात भूसंपादन विभागाच्या सहा कार्यालयांचा मुद्दाही समोर आला. या कार्यालयांचे क्रीडा संकुलाच्या आवारात स्थलांतर करताना संकुल समितीची मंजुरीच घेतलेली नाही. शासकीय कार्यालय असले तरी तशी नोंद कुठेही आढळून आलेली नाही असे क्रीडा अधिकारी नावंदे यांनी सांगितले. त्यामुळेच ही कार्यालये येथून हलविण्याबाबत क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत चर्चा झाली तसेच आजपर्यंतचे भाडे वसुल करण्याचाही निर्णय झाला. त्यानुसार भूसंपादन विभाग आणि बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. पण त्यांनी दाद न देता टोलवाटोलवी केली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. भूसंपादन विभागाच्या सहा कार्यालयांचे गेल्या ६ वर्षांचे भाडे हे रेडी रेकनर दरानुसार देण्यात यावे असे पत्र बांधकाम विभागाला देण्यात आलेले आहे. चालू दरानुसार या ६ कार्यालयांचे दरमहा सुमारे २ लाख रुपये भाडे मिळू शकते. तसेच आजपर्यंतचे थकीत भाड्याची रक्कम सुमारे दीड ते २ कोटी रुपये होईल. हे पैसे मिळाल्यास क्रीडा संकुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी तसेच खेळाडूंना विविध सुविधा पुरविण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.