नीरा येथे पथनाट्य व लोकगीताच्या माध्यमातून कोरोना व्हायरस आणि लसीकरणाबाबत जनजागृती

    नीरा : नीरा (ता.पुरंदर) येथे केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत आज (दि.३) कोरोना ‌‌‌‌व्हायरस आणि लसीकरणाबाबत पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो पुणे माहिती व जनसंपर्क संचालनालय यांच्यामार्फत हा उपक्रम राबवला जातो. त्यानुसार, लोकगीताच्या माध्यमातून कोरोनाबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर कोरोनाची लागण झाली असताना कोणती खबरदारी घ्यायची आणि लसीकरणाचे महत्त्वही पटवून दिले जात आहे.

    केंद्र सरकारच्या वतीने ‘आत्मनिर्भर भारत’ व ‘कोविड-१९’ लसीकरण जनजागृती महाअभियान राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीनाथ प्रतिष्ठान सातारानिर्मीत जनजागृती कलापथकाच्या पथनाट्याच्या माध्यमातून लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन लसीकरणासाठी लोकांना प्रवृत्त केले जात आहे. शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी व त्यासंबंधी उपाययोजनांची माहिती या चित्ररथावरील कलाकार अर्जुन लगस व संतोष कांबळे हे दोघेही लोकांना गीतातून व पथनाट्याच्या माध्यमातून लोकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत सांगत होते.

    मास्क वापरा, सुरक्षित अंतर पाळा, सॅनिटायजरचा वापर करा, हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, वयोवृद्ध यांची काळजी घ्या, लहान मुलांना विनाकारण घराबाहेर पडू देऊ नये. गरोदर महिलेच्या आरोग्याची काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नका. घरी राहा, सुरक्षित राहा या सर्व गोष्टी कलाकारांनी आपल्या पहाडी आवाजात गीत गायनातून समजून सागितले.

    या अभियानाविषयी संकल्पना प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरो मनिष देसाई यांची असून प्रकाश मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली व निखील देशमुख यांच्या आदेशानुसार सर्व कर्मचारी व पदाधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.