एसटी बसमधील वायफाय सेवेला उतरती कळा, मागणीअभावी वायफाय बनले शोभेचे ठोकळे

इंटरनेटचा वापर करून हवे ते एका क्लिकवर पाहता येणे शक्य आहे. त्यामुळे बसमधील वाय - फाय सेवेचा वापर करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करत बसण्याइतका वेळेही प्रवाशांकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय बसमधील वाय - फायमध्ये इंटरनेट व व्हॉट्स अ‍ॅप सेवेचा वापर करता येत नाही. परिणामी बसमधील या लोकप्रिय सेवेला आता उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. 

    पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काही वर्षांपूर्वी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी वाय – फाय सेवा सुरू केली खरी, मात्र मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे इंटरनेट सेवा स्वस्त झाल्याने बसमध्ये बसवलेल्या वाय – फाय सेवेचा वापर करण्यासाठी प्रवाशांकडे वेळेच नसल्याचे चित्र आहे. परिणामी बसमध्ये हजारो रुपये खर्च करून बसविलेले वाय – फाय सेवेचे बॉक्स शोभेची वस्तू बनले आहेत.

    स्मार्टफोनचा वाढता वापर आणि डिजिटल महाराष्ट्राची संकल्पना साकारण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने बसमध्ये वाय – फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे ही सुविधा शिवनेरी ते साध्या बसमध्येही आहे. या सर्व बसमध्ये ‘वोट गो’ मार्फत वाय – फाय सेवेचे बॉक्स बसविले. शहरी भागासह ग्रामीण भागात धावणाऱ्या बहुतांश बसमध्ये ही सुविधा आहे. याद्वारे प्रवाशांना स्मार्टफोनवर मराठी, हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिका विनाशुल्क पाहण्याची सुविधा आहे. या सुविधेचा वापर कसा करावा, याचे स्टीकर प्रत्येक सीटसमोर लावले आहे.

    मात्र आता प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये फोर जी सेवेचा वापर होत आहे. शिवाय विविध मोबाईल कंपन्यांचे अमर्याद इंटरनेट वापराचे प्लॅन स्वस्तात उपलब्ध आहेत. इंटरनेटचा वापर करून हवे ते एका क्लिकवर पाहता येणे शक्य आहे. त्यामुळे बसमधील वाय – फाय सेवेचा वापर करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करत बसण्याइतका वेळेही प्रवाशांकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे. शिवाय बसमधील वाय – फायमध्ये इंटरनेट व व्हॉट्स अ‍ॅप सेवेचा वापर करता येत नाही. परिणामी बसमधील या लोकप्रिय सेवेला आता उतरती कळा लागल्याचे चित्र दिसू लागले आहे.