नितीन लांडगे यांच्यासह पाच जणांना जामीन ; पहिल्या व तिसऱ्या सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी बंधनकारक

स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व लिपीक विजय चावरिया अशी जामिन मिळालेल्यांची नावे आहेत. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद शुक्रवारी झाला होता. न्यायालयाने मात्र, निकाल राखून ठेवला होता. सोमवारी न्यायालयाने हा निकाल दिला.

    पुणे : लाच प्रकरणात अटक असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाचही जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केला. २५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी हा आदेश दिला आहे. पहिल्या व तिसऱ्या सोमवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावायची. तसेच, तपासात ढवळाढवळ करायची नाही व पोलीसांना तपासात सहकार्य करायचे, असे आदेशात म्हटले आहे.

    स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचा पीए ज्ञानेश्वर पिंगळे, शिपाई अरविंद कांबळे, संगणक ऑपरेटर राजेंद्र शिंदे व लिपीक विजय चावरिया अशी जामिन मिळालेल्यांची नावे आहेत. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. दोन्ही बाजूचा युक्तीवाद शुक्रवारी झाला होता. न्यायालयाने मात्र, निकाल राखून ठेवला होता. सोमवारी न्यायालयाने हा निकाल दिला.

    लांडगे यांच्यावतीने अॅड. प्रताप परदेशी व अॅड. गोरक्षनाथ काळे यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास पुर्ण झाला असून आवश्यक ती कागदपत्रे जप्त केली आहेत. तसेच, पोलीसांना देखील तपासात मदत करण्यास तयार आहेत. त्यांना जामीन द्यावा, असा युक्तीवाद न्यायालयात केला. त्याला विरोध करताना सरकारी वकिल रमेश घोरपडे यांनी म्हटले की, तपास प्राथमिक स्थरावर आहे. ते १६ जण कोण आहेत हे स्पष्ट झालेले आहे. त्यांच्याकडे चौकशी करणे गरजेचे आहे. त्यांच्याकडील चौकशी होत नाही. तोपर्यंत जामीनावर सोडू नये. तसेच, तपास अधिकाऱ्यांना वेळ दिला पाहिजे व पुर्ण संधी मिळाली पाहिजे. जामीन दिल्यास ते तपासात ढवळाढवळ करण्याची शक्यता आहे. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर जामीन मंजूर केला.