सहा वासरांना कत्तलीसाठी नेणार असल्याची मिळाली बजरंग दलाला माहिती; अन् मग…

    राजगुरूनगर : खेड तालुक्यातील कनेरसर येथे बजरंग दलाकडून ६ वासरांना कत्तलीपासून जीवदान मिळाल्याची घटना शनिवारी (दि. २४) रात्री साडेअकरा वाजता घडली. संगमनेर येथून वासरे व्हॅनमधून कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळताच बजरंग दलाचे गोरक्षक दीपक गावडे, राजेश लांडे, बाली कुलकर्णी, ओंकार सोनार, निकेत आरबुज यांनी सापळा रचून ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस कंट्रोल रुमला दिली.
    त्यानंतर पोलिसांच्या मदतीने गाडी पकडली. या कारवाईत ऍड. निलेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोरक्षक अक्षय पऱ्हाड, योगीराज करवंदे, भाजप युमोचे योगेश पवार, रा. स्व. संघाचे सागर तनपुरे, कृष्णा कुलकर्णी, रेटवडी संयोजक अमोल काळे, बंटी हिंगे, मयूर भगत, भूषण चौधरी, हर्षद चौधरी, ऋतुराज चौधरी, अवधूत साळुंके, पंकज पारखी, राहुल रॉय, धनंजय खोल्लम, संकेत आर्वीकर, तेजस भानुसे यांनी सहभाग घेतला. कार्यकर्त्यांनी दुधाची व्यवस्था करून भुकेलेल्या वासरांना दूध पाजले.
    याप्रकरणी कैलास शिवलिंग जंगम व रशीद बाबूलाल इनामदार (रा. पाबळ, ता. शिरूर) यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ कायदा कलम ५ अ, ५ ब प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, सर्व वासरे भोसरी पांजारपोळ गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले आहेत.