श्री मोरया गोसावी महोत्सव काळात बाहेरगावावरून येणारे व्यापारी, विक्रेत्यांना बंदी घाला – नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांची मागणी

चतुर्थी व महोत्सवात बाहेरील गावावरून उत्सवामध्ये फिरते व्यापारी, विक्रेते श्री मोरया मंदीर रस्ता, गोखले आळी, चिंचवडे आळी, पडवळ आळी , गांधी पेठपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल लावतात. खरेदी-विक्री भर रस्त्यावर चालते. या फिरत्या विक्रेत्यांमुळे भाविक भक्तांना चालता देखील येत नाही.

पिंपरी: श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व मोरया भक्त, देवस्थान , ग्रामस्थ, महापालिका साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. त्यामुळे मंदिर परिसरात फिरते व्यापारी, विक्रेते यांना उत्सव काळात येण्यास बंदी घालावी. त्यामुळे गर्दी होणार नाही. भक्तांना सुरळीत दर्शन घेता येईल, अशी मागणी नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवदेन देण्यात आले आहे. त्यात नगरसेविका चिंचवडे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे यंदा श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी यांचा ४५९ वा संजीवन समाधी महोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. चतुर्थी व महोत्सवात बाहेरील गावावरून उत्सवामध्ये फिरते व्यापारी, विक्रेते श्री मोरया मंदीर रस्ता, गोखले आळी, चिंचवडे आळी, पडवळ आळी , गांधी पेठपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्टॉल लावतात. खरेदी-विक्री भर रस्त्यावर चालते. या फिरत्या विक्रेत्यांमुळे भाविक भक्तांना चालता देखील येत नाही. रस्त्यावर प्लॅस्टिक व कच-याचा खच तसाच टाकून जातात. यावर्षी मोठे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यामुळे भाविक-भक्तांचे दर्शन सुरळीत व सोशल डिस्टन्सिंग राखून होण्यासाठी फिरते विक्रेत्यांना चिंचवडमध्ये उत्सव काळात येण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी केली आहे