आंबेगाव तालुक्यात श्री क्षेत्र भीमाशंकर व पर्यटनस्थळी येथे जाण्यास बंदी

उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार : सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार

उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार : सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार 

                                                                                                                                                                                                                   भिमाशंकर :  घोडेगाव पोलीस ठाण्याचे हद्दीतील श्री क्षेत्र भीमाशंकर, डिंभे धरण व इतर परीसरातील पर्यटन व देवदर्शनावर भाविक व पर्यटकांना बंदी घातली आहे. घोडेगाव पोलीसांनी महत्वाचे रस्ते व पर्यटनस्थळांवर आदेशाची माहिती देणारे सूचना फलक लावले आहेत, या आदेशाचे कोणत्याही व्यक्तिने उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.  

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील मुंबई-पुणे व इतर राज्यांतुन पावसाळी पर्यटनाचे मुख्य आकर्षण असलेले ठिकाण बारा ज्योतिर्लींगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरचे दर्शनासह नागफणी पॉईंट, गुप्त भिमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉईट, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे यांसह भिमाशंकर अभयारण्यात फिरणे आदि परिसरामध्ये निसर्गाचा मनमुराद आनंद व देवदर्शन असा दुहेरी लाभ घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात.  

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने मागील अडीच महिन्यांपासून सर्व सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. जिल्हाबंदी, संचारबंदी व जमावबंदी लागू करत नागरिक एकत्र जमणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. या परिसरामध्ये पावसाळयात दर शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी सुमारे हजारोंच्या संख्येने भाविक व पर्यटक मोठया प्रमाणात येतात. तर इतर दिवशी पर्यटकांची संख्या शेकडांेच्या घरात असते. यावर्षी देवदर्शन व  पर्यटनासाठी गर्दी झाल्यास त्याचा विपरीत परीणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होईल. केवळ आंबेगाव तालुकाच नव्हे तर येथे येणा-या पर्यटकांच्या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग इतर भागात वेगात पसण्याची शक्यता आहे. 

जिल्हाधिकारी पुणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या आदेशान्वये कोरोनाच्या आजाराच्या अनुशंगाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून जिल्हयात भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी कोणत्याही व्यक्तिने याचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदयान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे, घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.  तसेच संबंधित ठिकाणी पोलिस पाटील, होमगार्ड यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.