‘माझी वसुंधरा’ अभियानात बारामती पहिल्या दहामध्ये

  बारामती : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाकडून ऑक्टोबर २०२० पासून सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियानात बारामती नगरपरिषदेने नगरपरिषद वर्गवारीमध्ये पहिल्या १० मध्ये स्थान पटकावले आहे. माझी वसुंधरा अभियान ऑक्टोबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ आणि ०१ मार्च ते १५ एप्रिल २०२१ अशा दोन टप्प्यामध्ये संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आले.

  त्रयस्थ संस्थेमार्फत कामाचे मूल्यांकन

  माझी वसुंधरा अभियानांतर्गत केलेल्या कामाचे मूल्यांकन (डेस्कटॉप असेसमेंट) राज्य शासनाने नेमलेल्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आले. यामध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या निसर्गातील पंचतत्वांना अनुसरून कामाची विभागणी केली गेली होती. मात्र कोरोना महामारीमुळे लागू असलेल्या निर्बंधामुळे अभियान कालावधीत केलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणे शक्य झाले नाही. त्यामुळे शासनातर्फे नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने पहिल्या दहा शहरांची दृकश्राव्य पध्दतीने ऑनलाईन सादरीकरण पाहून, व्हिडीओ टूरव्दारा पाहणी करून कामाचे अंतिम मूल्यांकन केले.

  रस्त्यांच्या दुतर्फा हरितीकरण

  पृथ्वी तत्वांतर्गत १२३०० झाडांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये ७४८० प्रजातींच्या झाडांची लागवड केली. वायूतत्वांतर्गत जानेवारी ते मार्च दरम्यान एकूण नऊ ठिकाणच्या हवेच्या नमुन्यांचे परिक्षण करण्यात आले. बारामती शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक मध्यम वायू गुणवत्ता गटात येतो. या कालावधीमध्ये शहरामधील रस्त्यांच्या दुतर्फा हरितीकरण करण्यात आले आहे. शहरात सायकल रॅलीचे आयोजन करून प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यात अाली. जल तत्वांतर्गत ३५५ दशलक्ष लिटर आणि १२८ दशलक्ष लिटर असे दोन साठवण तलाव कार्यरत असून १६५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या तिसऱ्या साठवण तलावाचे काम प्रगतीपथावर आहे. याचसोबत शहरामध्ये ११.५ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सध्या कार्यरत असून प्रतिदिन ११ दशलक्ष लिटर क्षमतेचे ३ सांडपाणी प्रकल्प (एसटीपी प्लान्ट)  प्रस्तावित आहेत.

  शाळा, महाविद्यालयात जनजागृती

  वसुंधरा दूत पाठवून अभियानाची सविस्तर माहिती सांगून हरित शपथ देण्यातअग्नी या तत्वांतर्गत ६० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल नगरपरिषद कार्यालयावर स्थापित करण्यात आले आहेत. आकाश या तत्वांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या गोष्टींचे महत्व वेगवेगळ्या सामाजिक माध्यमांव्दारे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालयाच्या सहकार्याने अभियानाचा प्रसार करण्याकरिता व जास्तीत जास्त नागरिकांनी हरित शपथ घेण्याच्या हेतूने सिटीजन व्हॉईस सर्वे घेण्यात आला. शहरातील सर्व मॉल्स, शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, व्यापारी महासंघ आणि शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांत नगरपरिषदेमार्फत वसुंधरा दूत पाठवून अभियानाची सविस्तर माहिती सांगून हरित शपथ देण्यात आली.

  व्हिडीओ टूरसाठी व्हिडीओव्दारे सादरीकरण

  राज्यातील प्रथम दहा शहरांना फील्ड असेसमेंटकरिता ऑनलाइन पध्दतीने सादरीकरण करण्याबाबत अभियान संचालकांनी कळविले. त्यास अनुसरून २९ मे २०२१ रोजी फिल्ड असेसमेंटकरिता बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी सादरीकरण केले. व्हिडीओ टूर करिता नगरपरिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी प्रत्यक्ष स्थळावर उपस्थित राहून व्हिडीओव्दारा माझी वसुंधरा अभियानाशी संलग्नित काम दाखविले. हे सादरीकरण तयार करण्याकामी अनेकांत व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. सलीम लाहोरी, प्रा. डॉ. अभिषेक दिक्षित, प्रा. डॉ. उमेश कोळीळमठ यांचे सहकार्य लाभले.