बारामती दूध संघाकडून वाढीव दराच्या फरकापोटी ३.७ कोटी दूध उत्पादकांना अदा

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने कोविड-१९ च्या अडचणीच्या काळात सन २०२०-२१ या वर्षात पुरविलेल्या दूधाला प्रति लिटर ४० पैसे वाढीव दर दिला होता. या वाढीव दराच्या फरकापोटी ३ कोटी ६० लाख रुपये दूध उत्पादकांना देण्यात आले असून, कर्मचाऱ्यांना २५% दराने लाभांश रक्कम रुपये एक कोटी ४५ लाख रुपये अदा केली आहे. दूध संघाच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसह दूध संघाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

    बारामती दूध संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री अजित पवार खा.सुप्रिया सुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून सध्या बारामती दूध संघाचे दररोज सुमारे २.२५ लाख लिटर्स दूध संकलन होत आहे. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत दूधाला तसेच दूध पावडर व बटर इत्यादीची मागणी वाढल्यामुळे दूध उत्पादक शेतक-यांना सध्या गाय दूध दर प्रति लिटर रू.२५ (३.५/८.५ गुणप्रतकरीता) दिला जात आहे. बारामती दूध संघाने कोवीड–१९ च्या काळात दूध धंद्याची परिस्थिती अत्यंत बिकट असताना देखील अनेक अडीचणींना तोंड देवून, सन २०२०-२०२१ या वर्षात पुरविलेल्या दूधाकरीता दूध उत्पादक शेतक-यांना प्रति लिटर ४० पैसे प्रमाणे दुध दरफरक रक्कम रू.३.०७ कोटी देण्यात आले आहेत. तसेच संघाच्या कायम कर्मचा-यांना २५% (तीन पगार) बोनस रक्कम रू.१.४५ कोटी देण्यात आला आहे.

    संघामार्फत सर्व प्राथमिक दूध संस्थांना पशुवैद्यकीय सेवा–सुविधा, आर्युवेदिक उपचार पध्दत, प्रशिक्षण, मुरघास प्रशिक्षण दिले जाते. तसेच दुध उत्पादकांना डेअरी साहित्य विभागामार्फत चाफकटर, मिल्कींग मशिन, मुरघास बॅग व मका बियाणे इत्यादीची अनुदानावर (स्वस्त दरात) विक्री केली जाते. संघाचे पॅकींग दूध “नंदन’ ब्रँडने विविध शहरांमध्ये विक्री होत असून सदरचे दूध पुणे, नाशिक, शिर्डी, मालेगांव, मुंबई, रोहा, महाड, औरंगाबाद, नांदेड, लातूर, सोलापूर, गुलबर्गा या विविध शहरामध्ये विक्री होत आहे. विविध नामांकित कंपन्यांना, त्यामध्ये मदर डेअरी दिल्ली, कॉफी डे, ताज हॉटेल, ग्रॅड हयात हॉटेल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, हिंदुजा हॉस्पीटल, बॅच कॅन्डी हॉस्पीटल, मंत्रालय, कोकण भवन इत्यादी ठिकाणी संघाच्या नंदन दूधाची विक्री होत आहे.

    बारामती दूध संघाचे दूध उत्पादक शेतक-यांसाठी योग्य व वाजवी किंमतीत नंदन सुप्रिम, नंदन गोल्ड, नंदन गोल्ड प्लस, नंदन सिलव्हर इत्यादी पशुखाद्य तसेच नंदन मिल्कमीन इत्यादी प्रकारचे दर्जेदार उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणली असून बारामती तालुक्यासह, दौंड, पुरंदर, फलटण, इंदापूर, करमाळा, टेंभूर्णी, सोलापूर इत्यादी ठिकाणी विक्री केली जाते.