बोपदेव घाटात लुटमारी करून धूम ठोकणारे जेरबंद ; बारामती पोलिसांची कामगिरी

बारामती : कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असणा-या बोपदेव घाटात एकाला अडवून त्याच्याकडील १ लाख ३० हजार रुपयांची रोकड लुटणा-या टोळीतील दोघांना जेरबंद करण्यास बारामती पोलिसांना यश आले आहे.

रोहित सुरेश बाबर(रा.महात्मा फुले सोसायटी, ता पुरंदर), राजेश सीताराम निघोल (रा. दत्तनगर, ता. पुरंदर)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २९ आॅक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास बाबदेव घाट परिसरातील हाॅटेल गारवा जवळ एका दुचाकीस्वार इसमास अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ जणांनी अडवून, त्यांच्याकडील सॅकमध्ये असणारी १ लाख ३० हजार रूपयांची रोकड जबरदस्तीने लुटली होती. याप्रकरणी अज्ञात आठ जणांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याची माहिती पुणे शहर पोलिसांकडून मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन शिंदे, प्रकाश वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलिस नाईक रुपेश साळुंखे, सिताप, पोलिस हवालदार सुहास लाटणे, दशरथ इंगवले, बंडू कोठे, योगेश कुलकर्णी, अजित राऊत, तुषार चव्हाण, अकबर शेख यांना दि १ डिसेंबर रोजी बारामती शहराच्या हद्दीत रात्री बारा ते सकाळी सहाच्या सुमारास फलटण चौकात एक लाल रंगाची हिरो होंडा कंपनीची करिझ्मा दुचाकी (क्र १२१२),तसेच पल्सर (क्र. एम .एच १२,एस.झेड ३५६०)या दोन दुचाकीवरील इसम रोहित सुरेश बाबर व राजेश सीताराम निघोल हे दोघे सापडले. त्यांना ताब्यात घेऊन बारामती शहर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर या दोघांनी बाबदेव घाट परिसरातील गुन्हा चेतन उर्फ भैय्या वैराग,सनी मिसाळ, जगन्नाथ दत्ता वाघमारे, बाबू(पुर्ण नाव माहित नाही), (सर्व रा. सासवड, ता पुरंदर) यांच्या सहाय्याने केल्याची कबुली दिली. या लुटमारीतील १ लाख ३० हजारांची रक्कम सर्व साथीदारात वाटून घेवून खर्च केल्याचे सांगितले. या सात जणांना दुचाकीसह पोलिसांनी अटक केली. या आरोपींना कोंढवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कामगिरी पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने केली.