पुणे जि.प.च्या ‘डिजीटल बजेट’ला बारामतीच्या तंत्रज्ञानाची जोड!

जिल्हा परिषदेचे 'डिजिटल पाऊल' ऐतिहासिक,फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत थेट पोहोचला अर्थसंकल्प

    बारामती : पुणे जिल्हा परिषदेने प्रथमच अर्थसंकल्पाचे सोशल माध्यमाच्या सहाय्याने लाईव्ह प्रसारण करुन आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. थेट जनतेपर्यंत अर्थसंकल्पाचे सादरीकरण पोहोचविणारी पुणे जिल्हा परीषद ही पहिली जिल्हा परिषद ठरली आहे.याशिवाय अर्थसंकल्पातील तरतुदींचे पीडीएफ व इतर माध्यमातून नेमके सादरीकरणही करण्यात आले. हा कौतुकास्पद उपक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली, खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांच्या सुचनेनुसार बारामती येथील तंत्रज्ञ स्टर्लिंग सिस्टीम्स चे सतीश पवार यांच्या सहकार्याने साकारण्यात आला आहे.

    फेसबुक लाईव्ह आणि डिजीटल पीडीएफच्या माध्यमातून ग्रामीण भागात बजेट पोहचविण्याचा अभिनव प्रयोग यशस्वी झाला. सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने डिजीटल कामकाज करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या जिल्हा परिषदेने फेसबुक लाइव्हद्वारे अर्थसंकल्प मांडला आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत पेजवरून फेसबुक लाईव्हला केवळ दहा दिवसात ३५ हजार पेक्षा जास्त व्हिव्यूज मिळाले असून दररोज जास्तीत शेयर आणि व्हिव्यूज काही पटीत वाढत आहे.

    या संदर्भात माहिती देताना पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व अर्थ समितीचे सभापती रणजीत शिवतरे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गर्दी टाळत पुणे जिल्हा परिषदेची मुख्य सर्वसाधारण सभा पार पाडली. या सभेत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अभिनव पद्धतीने मांडला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प डिजीटल प्लॅटफॉर्मवरून मांडला गेला.आमच्या खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडला. राज्याचे कामगारमंत्री दिलिप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे हे दोन मंत्री, खासदार सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे हे खासदार व इतर पदाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील बहुतांश आमदार यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह लिंक शेयर करीत या उपक्रमाचे कौतुक केले. या सोबतच अर्थसंकल्पातील योजना व निधींची माहिती सोप्या भाषेत समजाव्या यासाठी आम्ही संपुर्ण बजेट डिझाईन पीडीएफ द्वारे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचविले. ग्रामीण भागातील नागरिकांनी याला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांचा प्रशासकीय कामकाजाचा वेळ वाचावा तसेच योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेचे निर्णय, योजना आणि कार्यक्रमांची प्रसिद्धी प्रभावीपणे करणार आहोत, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

    पुणे जिल्हा परिषदेच्या डिजीटल बजेटसाठी तंत्रज्ञान सहाय्य पुरविणारे बारामती येथील ‘स्टर्लिंग सिस्टीम्स’ या आयटी कंपनीचे संस्थापक सतिश पवार म्हणाले, जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प संबंधित जिल्ह्यासाठी अतिशय आवश्यक असतो.ही एक प्रकारची मिनी संसद असून तेथे सादर होणारा अर्थसंकल्प, त्यातील तरतुदी,नवीन योजना यांची माहिती जनतेला मिळावी असा यामागचा हेतू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी यावर्षी फेसबुक लाईव्ह व डिजिटल अर्थसंकल्पाची संकल्पना मांडली. त्यानुसार आम्ही नियोजन केले. हा उपक्रम यशस्वी झाला याचे समाधान आहे.