कोंढापुरीत दाम्पत्याला मारहाण करत वीस हजार लांबविले

शिक्रापूर : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील एका भाजीपाला विक्री करणाऱ्या दाम्पत्याला एका टोळक्याने घरात घुसून मारहाण करून वीस हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. कोंढापुरी (ता. शिरूर) येथील विक्रम ढसाळ हे घरात झोपलेले असताना रात्री साडेबाराच्या सुमारास कोणीतरी त्यांच्या घराचा दरवाजा वाजविल्याने ढसाळ यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच गावातील आदित्य पंचमुख व ओंकार ढसाळ यांसह इतर चार जन जबरदस्तीने घरात घुसले आणि काहीही कारण नसताना घरातील साहित्यांची मोडतोड करत विक्रम ढसाळ यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली तसेच ढसाळ यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी झालेल्या गोंधळात कोणीतरी ढसाळ यांच्या घरातील वीस हजार रुपये देखील काढून नेले. याबाबत विक्रम बापूराव ढसाळ रा. कोंढापुरी (ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी आदित्य विकास पंचमुख, ओंकार अशोक ढसाळ, साहिल विकास पंचमुख, बाळू रोकडे, अशोक पोपट ढसाळ, आलोक अशोक ढसाळ सर्व रा. भीमनगर कोंढापुरी (ता. शिरूर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र पवार हे करत आहे.