पाच लाख खर्च करूनही मिळाला नाही योग्य भाव; निराश शेतकऱ्याने रस्त्यावरच फेकली ढोबळी

    इंदापूर : पाच लाख खर्च करुन जोपसलेल्या ढोबळी मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी आणल्यानंतर प्रतिकिलोला दोन रुपये देखील दर न मिळाल्याने उद्विग्न झालेल्या शेतकरी पिता-पुत्रांनी फुकट मिरची वाटली. उरलेली पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ओतून दिली. रविवारी (दि.२९) दुपारी ही घटना घडली.

    सविस्तर हकीकत अशी की, तालुक्यातील वडापूरी गावचे शेतकरी खंडू राजगुरु यांनी तीन महिन्यांपूर्वी तीन एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. त्याला पाच लाख रुपये खर्च आला. मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी त्यांनी रविवारच्या आठवडा बाजारात आणला होता. मात्र, प्रतिकिलोस दोन रुपये देखील दर मिळाला नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या खंडू राजगुरु व त्यांचा मुलगा नवनाथ या दोघांनी ढोबळी मिरचीने भरलेले वाहन शहरातील बाबा चौकात आणले. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मधोमध उभा करुन ये जा करणारांना ढोबळी मिरची फुकट वाटली.उरलेली मिरची रस्त्यावर ओतून दिली.

    पत्रकारांशी बोलताना नवनाथ राजगुरु याने सांगितले की, हे पीक जोपासण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर जनरेटरने पाणी दिले आहे. पाच लाख रुपये खर्च करून पाचशे रुपये सुध्दा पट्टी आली नाही. त्यामुळे मिरची फुकट वाटून ओतून दिली आहे. येत्या पाच दिवसात शासनाने दराबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर याच जागेवर मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्याने दिला आहे.

    कुठल्याच पिकाला दर नाही अशा शब्दांत खेद व्यक्त करत खंडू राजगुरु यांनी विजेचे बिल आल्याखेरीज राहणार आहे का?औषध, पाणी, मजुरी फुकट आहे का? असे प्रश्न उपस्थित केले. आत्महत्या करु की काय करु. मला टेन्शन सहन होत नाही. या शब्दांत आपल्या भावना व्यक्त करुन त्यांनी पत्रकारांना निरुत्तर करुन टाकले.