भांबर्डे गावाला चक्रीवादळाचा फटकागावकरी मदतीच्या प्रतीक्षेत

मुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे.

 मुळशी ः निसर्गचक्रीवादळाचा मुळशी तालुक्याला मोठा फटका बसला आहे. मुळशी धरणाच्यावरील भागातील सर्वात मोठे गाव असणारे भांबर्डे गावाला या चक्रीवादळाचा सर्वाधिक नुकसान झाले आहे. भांबर्डे, गावठाण, रामवाडी, आंबेडकरनगर, एकोले, आडगाव, तैलबैले या गावातील वादळात सर्वच घरांचे पत्रे उडून गेले असून घरांची पडझड झाली आहे. एकट्या भांबर्डे गावात १८४ कुटुंब या पावसाने बाधित झाली आहेत. वादळासोबत आलेल्या पावसाने घरात ठेवलेले धान्य, लाकडूफाटा, जनावरांचा पेंडा देखील भिजलेला आहे. बुधवारी आलेल्या चक्रीवादळानंतर अवघ्या १२ ते २ या दोन तासातच होत्याचे नव्हते झाले. वेगाने वाहणारा वारा आणि पाऊस याच्यामुळे भांबर्डे आणि एकोेले गावातील सर्वच घरांचे पत्र उडून गेले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र पावसाळ्यासाठीची बेगमी म्हणून घरात जमा केलेले धान्य आणि इतर साहित्य पावसात भिजले. घरांचे पत्र उडाल्याने लोकांनी गावातील शाळेत आश्रय घेतला मात्र काही वेळाने शाळेची ही पत्रे उडून गेली. प्रशासनाच्यावतीने गावकऱ्यांची व्यवस्था गावातील मंदिरामध्ये करण्यात आली असल्याचे तलाठी गणेश पोतदार यांनी सांगितले.

-आंबेडकरनगर, एकोले या गावाचे प्रचंड नुकसान
वादळाने भांबर्डे गावातील गावठाण, रामवाडी, आंबेडकरनगर, एकोले यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वच घरांची पत्रे उडून गेले असून पावसाळ्यासाठी घरात साठवलेले धान्य देखील पावसात भिजले आहे. प्रशासनाच्यावतीने आम्ही पंचनामे पुर्ण केले आहेत. गावकऱ्यांची राहण्याची व्यवस्था गावातील मंदिरामध्ये, शेजारील गावामध्ये करण्यात आली आहे.  
 गणेश पोतदार, तलाठी, भांबर्डे गाव
-शासनाने लवकरात लवकर मदत करावी  
आम्ही कसे जगायचेवादळाने काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. गावातील सर्वच घरांची पडझड झाली आहे. घरातील धान्य, किराना पावसाने भिजलेला आहे. कोरोनामुळे पुण्या मुंबईकडे गावातील असणारे लोक पुन्हा गावी आले आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. ते देखील या संकटात सापडले आहेत. धान्य भिजली आहेत. घरांची मोठी पडझड झाली आहे. त्यामुळे आम्ही जगायचे तरी कसे, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. शासनाने लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे.