भाटघर धरण 100 टक्के भरले; धरणातून नीरा नदीत 5 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु

    माळेगाव / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत मुसळधार पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. परंतु गेल्या दोन दिवसांपासून नीरा खोऱ्यातील धरण साखळीत मुसळधार पावसामुळे भाटघर धरण शंभर टक्के भरले आहे. नीरा देवधर धरण या आधीच 100 टक्के भरले आहे. दोन्ही धरणे 100 टक्के भरल्याने बारामतीच्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

    पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. गोकुळाष्टमी नंतर या भागात रब्बी हंगामातील पेरण्या सुरू होतात. मात्र, पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत होता. याशिवाय नीरा खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या उसाच्या लागणी देखील रखडल्या होत्या. पण नीरा नदीच्या खोऱ्यातील भाटघर आणि नीरा देवधर ही दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहेत. मात्र, नीरा देवधर आणि भाटघर धरणाच्या खाली असलेल्या वीर आणि गुंजवणी धरण अद्याप भरली नाहीत. सध्या वीर धरणात 79 टक्के आणि गुंजवणी धरणा 97 टक्के पाणीसाठा आहे. सध्या नीरा देवधर धरणातून 2494 क्युसेक आणि भाटघर धरणातून 5124 क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पाऊस असाच चालू राहिल्यास वीर लवकरच भरण्याची शक्यता आहे.

    वीर आणि गुंजवणी ही दोन्ही धरणे भरल्यावर पुणे जिल्ह्यातल्या बारामती आणि इंदापूर तालुक्यातील बहुतांशी गावांचा पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो तर नीरा उजवा कालव्यातून सातारा जिल्ह्यातील काही गावे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना शेतीसाठी पाणी मिळते. त्यामुळे नीरा खोऱ्यातील धरणे शंभर टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.