भाऊसाहेब सपकळ यांची ‘घरवापसी’; पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश

    इंदापूर : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात बंड पुकारुन भाजपवासी झालेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब सपकळ हे भरणे यांच्या उपस्थितीत आपल्या कार्यकर्त्यांसह आज (दि.२०) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतले आहेत.

    आपली भूमिका मांडताना सपकळ म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत गैरसमजामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलो होतो. इंदापूर तालुक्याला राष्ट्रवादी काँग्रेस व दत्तात्रय भरणे यांच्याशिवाय पर्याय नाही याची खात्री पटल्याने, आपण परतलो आहोत. आपल्या सर्व सहकाऱ्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे व भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करणार असल्याचे सपकळ यांनी सांगितले.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, कार्याध्यक्ष अतुल झगडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन सपकळ, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश शिंदे, विजय घोगरे, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष सागर मिसाळ, तात्यासाहेब वडापूरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

    दोनच दिवसांपूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील, संग्रामसिंह पाटील, कुलदीप पाटील, भोडणीचे ग्रामपंचायत सदस्य ॲड. संचित हांगे यांनी आपल्याकडे खेचून घेण्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यशस्वी झाले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे पद भूषवणाऱ्या सपकळ यांना देखील पक्षात परत आणण्याची कामगिरी भरणे यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची जास्तीची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने आज भरणे यांनी इंदापूर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे संचालक, विद्यमान नगरसेवक भरत शहा व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

    सुमारे एक तास चर्चा केली. चर्चेचा पूर्ण तपशील समजला नसला तरी त्यांनी शहा बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिल्याची खात्रीलायक माहिती आहे. मुकुंद शहा यांच्या पत्नी अंकिता शहा या विद्यमान नगराध्यक्षा आहेत. नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर देण्यात आलेले पक्ष प्रवेशाचे निमंत्रण ही मोठी घटना आहे.