भिगवण ट्रामा केअर सेंटरमध्ये पावसामुळे पाणीच पाणी; परिसराला ओढ्याचे स्वरूप

    भिगवण : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होत आहे. तर काही बागायतदारांचे नुकसान झाले आहे. इंदापूर तालुक्यात भिगवण परिसरात सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. तसेच इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादरम्यान भिगवण ट्रामा केअर सेंटरमध्ये मुसळधार पावसामुळे ओढ्याचे स्वरूप आले.

    या परिसरात दीड तासापासून जोरदार पाऊस झाला. भिगवण येथील नव्याने बांधलेल्या ट्रामा केअर सेंटरमध्ये कोविड सेंटर सुरू केले आहे. कोरोना महामारीच्या काळात रुग्ण उपचार घेत असलेल्या इमारतीच्या मागील बाजूला पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे त्या ठिकाणी ओढ्याचे चित्र तात्पुरत्या स्वरूपात निर्माण झाले होते. याबाबत डॉ. व्यवहारे यांनी सांगितले की, सदर पाणी कोविड सेंटरच्या पाठीमागील इमारतीत असल्याने रुग्णांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. पावसाचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने तेथील परिसर पाण्याने वेढला होता.

    अनेकांच्या घरात पाणी

    डोंगराच्या मध्यभागी भाग असल्याने पावसाचे पाणी पूर्ण क्षमतेने रस्त्यावरून थेट गावात घुसत आहे. यामुळे ठिकठिकाणी पाण्यामुळे रस्त्यावर डबके तयार होऊन खड्डे पडत आहेत. त्याचबरोबर काहींच्या घरात पाणी शिरले. प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. येत्या काळात अशाप्रकारे पावसाच्या पाण्याने पुन्हा ओढ्याचे स्वरूप आले तर नागरिकांसह आरोग्यव्यवस्थाही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.