भीमा पाटस वीस वर्षांत चावून खाल्ला  ; माजी आमदार रमेश थोरात यांचा नाव न घेता भीमा पाटसचे अध्यक्ष व आमदार राहुल कुल यांच्यावर हल्लाबोल

दौंड : भीमा पाटसच्या गोडाऊनमधील हजारो साखरेची पोती २५ जानेवारी रोजी शॉर्टसर्किटमुळे जाळून खाक झाली असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले होते. पण पोलीस तपासात साखरेची पोती जाणीवपूर्वक पेटून दिल्याचे समोर आले असल्याचे, राष्ट्रवादीचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी आंदोलनावेळी सांगितले,

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा पाटस कारखान्यावर रविवार (ता.११) रोजी राष्ट्रवादीचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते, यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी भीमा पाटसच्या कारभारावर सडकून टीका केली, तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी भीमा पाटस चालू करण्यासाठी मदत करू असे आश्वासन दिले, या आंदोलनाला जिल्हा परिषद सभापती सारिका पानसरे, पंचायत समिती सभापती आशा शितोळे, जिल्हा परिषद सदस्य राणी शेळके, भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वाशील शितोळे, नितीन शितोळे, शिवाजी ढमाले, संपत भागवत आदी पदाधिकारी, शेतकरी, सभासद व कामगार उपस्थित होते, भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै. मधुकर शितोळे यांच्या पुतळ्याचे पूजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.

पुढे बोलताना थोरात म्हणाले की, भीमा पाटस कारखानाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटींची मदत करून ही २०१९-२० ला बंद राहिला होता, तसेच २०२०-२१ च्या गाळप हंगामात परिसरात मोठया प्रमाणात ऊस उपलब्ध आहे. साखर कारखान्याने ऊसाचे गळीत हंगाम पूर्ण होऊन ही ऊस शिल्लक राहिल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत भीमा पाटस कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू झाला पाहिजे. भीमा पाटसच्या सभासद व परिसरातील शेतकऱ्यांना ऊस तोडणी संदर्भात अडचणी निर्माण होणार नाहीत. पाटसच्या भीमा सहकारी साखर कारखानामध्ये सभासदांचे ५० कोटी शेअर्स व ५० कोटींच्या ठेवी असून एकूण ६० हजार सभासद आहेत, भीमा पाटसवर जिल्हा बँकेचे एकूण १५० कोटी व इतर बँकांचे एकूण ५४० कोटींचे कर्ज थकीत आहे, सध्याच्या भीमा पाटसच्या कारभाराला चेअरमन व संचालक मंडळ जवाबदार असल्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी आंदोलना वेळी सांगितले.

पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखाना २०२०-२१ चा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी व भीमा पाटसच्या कामगारांचे ४० ते ४५ महिन्यांचे थकीत पगार त्वरीत अदा करावेत या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले होते, यावेळी विविध मागण्यांचे लेखी निवेदन दौंड तहसीलदार संजय पाटील यांना देण्यात आले.

– थकीत वेतनासाठी जागरण गोंधळ
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना परिसरात सहकारी साखर कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी व कामगारांचे थकीत वेतन लवकर मिळण्यासाठी जागरण गोंधळ घालून साकडे घालण्यात आले,