कैलास बारणे सभागृहात गैरहजर रहिल्याने मोठा गोंधळ; खरे कारण आले समोर

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिति सदस्य पद निवड़ीत अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे सभागृहात गैरहजर रहिल्याने मोठा गोंधळ उडाला. राजकीय दबावामुळेच ते ग़ैरहजर राहिल्याची चर्चा होती.

    पिंपरी (Pimpri).  पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्थायी समिति सदस्य पद निवड़ीत अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे सभागृहात गैरहजर रहिल्याने मोठा गोंधळ उडाला. राजकीय दबावामुळेच ते ग़ैरहजर राहिल्याची चर्चा होती. मात्र आता कैलास बारणे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या गैरहजेरीचे खरे कारण स्पष्ट झाले आहे.

    अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांचा कोरोनाचा रिपोर्ट आज (दि.२०) पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून त्यांची तब्येत बरी नव्हती. स्थायी समितीतील अपक्ष आघाडीच्या सदस्य निवडीवेळी बारणे यांच्या गैरहजेरीमुळे महासभेत बराच वाद निर्माण झाला होता. राजकीय दबावामुळे बारणे महासभेत आले नसल्याची चर्चा होती.

    गेल्या चार-पाच दिवसांपासून कैलास बारणे यांची प्रकृती बिघडली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्याने ते होम क्वारंटाईन झाले होते. त्यांचा मोबाईल देखील बंद होता. आज बारणे यांनी महापालिकेच्या खिंवसरा रूग्णालयात कोरोनाची अँन्टीजेन तपासणी केली. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सध्या कैलास बारणे यांना कुठलाही त्रास होत नसून प्रकृती ठिक असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.

    २०१७ ला महापालिकेत ५ नगरसेवक अपक्ष निवडुण आले होते. त्यानंतर अपक्ष आघाडीचे गटनेते पदी कैलास बारणे यांची निवड झाली होती. पाच वर्षात क्रमाक्रमाने प्रत्येकाला स्थायीत संधी दिली जाईल असे ठरले होते. त्यानुसार पहिल्यावर्षी स्वत: कैलास बारणे यांना संधी मिळाली. त्यानंतर दुसर्यावर्षी साधना मळेकर तर तिसर्या आणि चौथ्या वर्षी झामाबाई बारणे यांना सलग दोन वर्षे स्थायीत संधी देण्यात आली. आता हे शेवटे वर्ष असल्यामुळे नवनाथ जगताप आणि नीता पाडाळे यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार होती. मात्र महासभेत सदस्य निवडीवेळी गटनेते कैलास बारणे गैरहजर होते.

    नवनाथ जगताप यांना डावलून नीता पाडाळे यांच्या निवडीचे थेट पत्र सभागृहात सादर करण्यात आले. राजकीय व्देषातून जगताप यांचा पत्ता कट केल्याच्या भावनेतून सभागृहात बराच गोंधळ उडाला. गटनेते म्हणून कैलास बारणे यांच्या गैरहजेरीवर ठपका ठेवण्यात आला होता. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप यांच्यात मोठा संघर्ष आहे. त्यामुळे राजकीय दबावामुळेच अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे सभागृहात गैरहजर राहिल्याची चर्चा होती. मात्र, आज कैलास बारणे यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या गैरहजेरीचे खरे कारण स्पष्ट झाले आहे.