भाजपने दहा मिनिटांत 22 विषय मंजूर करत गुंडाळले सभेचे कामकाज

  पिंपरी : लाचप्रकरणी स्थायी समितीच्या अध्यक्षांना झालेली अटक आणि दोन दिवसांची मिळालेली पोलीस कोठडी, आक्रमक झालेले विरोधक या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ऑगस्ट महिन्याची महासभा ऑनलाइन पद्धतीने रेटून नेली. विषयाचे वाचन, उपसूचना आणि मंजुरी असे करत अवघ्या दहा मिनिटांत 22 विषय मंजुर करत सभेचे कामकाज गुंडाळले. यावर महापौरांनी बंद दाराआड घेतलेली सभा बेकायदेशीर असून ती रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे विरोधकांनी सांगितले.

  स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह पाच कर्मचा-यांना लाच प्रकरणी अटक झाली असून त्यापार्श्वभूमीवर आज होणारी महासभा वादळी झाली. सकाळपासून महापालिका प्रवेशद्वारासमोर विरोधक, सामाजिक संघटनांकडून आंदोलन करण्यात आले. सभा सुरु होण्यापूर्वी राष्ट्रवादी, शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौर दालनासमोर आंदोलन केले. ”फक्त भय आणि भ्रष्टाचार हाच भाजपचा एकच विचार”, ”स्थायी समिती बरखास्त करा”, ”भ्रष्टाचारी भाजपचा धिक्कार असो”, ”महापौरांनी राजीनामा द्यावा”, ”महापालिका बरखास्त करा” अशा जोरदार घोषणा विरोधकांनी दिल्या. दुपारी दोन वाजून पाच मिनिटांनी महापौर कक्षातून सभा कामकाज सुरु झाले. उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.

  सभा सुरु होताच विरोधक स्थायी समिती सभागृहात गेले. महापौरांकडे बोलू देण्याची विनंती केली. परंतु, महापौरांनी त्याकडे दुर्लक्ष करत सभाकामकाज सुरु केले. त्यावर आक्रमक झालेल्या विरोधकांनी महापौर दालनाकडे धाव घेतली. परंतु, सुरक्षारक्षकांनी विरोधकांना दालनात जाण्यापासून रोखले. विरोधकांनी आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न केला. पण, त्यांना आतमध्ये जाऊ दिले नाही. त्यातच भाजपने अवघ्या 10 मिनिटात सभाकामकाज रेटून नेत सभा कामकाज संपविले. 2 वाजून 5 मिनिटांनी सुरु झालेली सभा 2 वाजून 15 मिनिटांनी संपली.

  सभा संपल्यानंतर विरोधकांनी बोलून न दिल्याबाबत महापौरांकडे जाब विचारला. महापौर नेत्यांच्या आदेशानुसार दबावात काम करत आहेत. पालिकेच्या इतिहास पहिल्यांदाच बंद दाराआड महासभा घेतली. आजची सभा पूर्णपणे बेकायदेशीर आहे. विरोधकांचा आवाज म्युट केला होता. आम्हाला बोलू दिले नाही. आजच्या सभेतील कामकाज रद्द करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे विरोधकांनी सांगितले.

  स्थायी समिती अध्यक्षाला अटक केली असून पोलीस कोठडीत ठेवले. हे निंदणीय आहे. असे असताना कोणतीही लाज न बाळगता सत्ताधारी भाजपने सभा रेटून नेत सभेचे कामकाज केले. आम्हाला नगरसेवक म्हणून घेण्याची लाज वाटत असल्याचा संताप विरोधकांनी महापौरांसमोर व्यक्त केला. त्यावर महापौर ढोरे यांनी स्थायीत सर्वपक्षीय नगरसेवक असतात. मी कोणाच्या दबावाखाली काम करत नाही. आजची सभा नियमप्रमाणे पार पाडल्याचे विरोधकांना सुनावले.

  विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी महापौर योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, मयूर कलाटे, समीर मासूळकर, विनोद नढे, राहुल भोसले, मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, सचिन भोसले, वैशाली काळभोर, उषा वाघेरे, उषा काळे आदी नगरसेवक आंदोलनात सहभागी झाले होते.