भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचे ‘गांधीगिरी’ आंदोलन

नगरसेवक तुषार कामठे यांनी राष्ट्रवादीच्या माजी महापौराचे नाव न घेता टीका केली आहे. स्थायी समिती सभेत मे. गॅब इंटरप्राईझेस या संस्थेला ५ कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या विरोधात आयुक्त दालनसमोर गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही नगरसेवक कामठे यांनी दिला होता.

    पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी महापौर आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवकाच्या संबंधित ठेकेदाराची विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत चौकशी सुरू असताना आणखी ५ कोटी रुपयांचे काम देण्यात आले. याच्या निषेधार्थ सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक तुषार कामठे यांनी बुधवारी ‘गांधीगिरी’ आंदोलन केले.

    महापालिका आयुक्त राजेश पाटील आणि अधिकारी राष्ट्रवादीच्या माजी महापौरासाठी पायघड्या घालीत आहेत. शहरातील करदात्याचे पैशांची महापालिका अधिकारी आणि ठेकेदार मिळून लूट करीत आहेत. आर्थिक दुर्बल घटकांना ३ हजार रुपयांची मदत करण्याचा प्रस्ताव मंजूर झालेला असाताना आयुक्तांनी तो विभागीय आयुक्तांकडे पाठवला. त्यांचा अभिप्राय आल्यानंतर मदत देवू, अशी ताठर भूमिका घेतली.

    मात्र, दुसऱ्या बाजुला राष्ट्रवादीच्या माजी महापौरासोबत आर्थिक हितसंबंध असलेल्या आणि विभागीय आयुक्तांकडे चौकशी सुरू असलेल्या ठेकेदाराला ५ कोटी रुपयांचे काम बिनबोभाटपणे देण्याची भूमिका आयुक्त राजेश पाटील घेत आहेत, अशी टीका नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

    महापालिका आयुक्त दालनासमोरच नगरसेवक कामठे यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यावर राष्ट्रवादी माजी महापौर असलेल्या नेत्याला थेट आव्हानही दिले आहे. त्यामुळे या ठेकेदाराच्या ५ कोटीच्या कामावरुन पुन्हा एकदा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

    नगरसेवक तुषार कामठे यांनी राष्ट्रवादीच्या माजी महापौराचे नाव न घेता टीका केली आहे. स्थायी समिती सभेत मे. गॅब इंटरप्राईझेस या संस्थेला ५ कोटी रुपयांचे काम देण्यात येणार आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आयुक्त राजेश पाटील यांच्या विरोधात आयुक्त दालनसमोर गांधीगिरी आंदोलन करण्याचा इशाराही नगरसेवक कामठे यांनी दिला होता. त्यामुळे आता राष्ट्रवादीचा ‘तो’ माजी महापौर कोण? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.