‘आयुक्तांनी आम्हाला चुना लावला’; सत्ताधारी भाजप नगरसेवकांचा हल्लाबोल

    पिंपरी : कोरोनाच्या संकट काळात आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना एकावेळी ३ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय आयुक्तांशी चर्चा करून घेतला होता. पण, नंतर कायद्याचा बागलबुवा करून जाणीवपूर्वक गोरगरिबांना मदतीपासून वंचित ठेवले. आयुक्तांनी आम्हाला चुना लावला, असा हल्लाबोल सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केला. तर मदतीच्या विषयाला भावनिक स्वरूप देऊन राजकारण करू नये. विषय भरकटू देऊ नये. नियमात बसवून गोरगरिबांना मदत करावी. नाहक आयुक्तांवर टीका करू नये, अशी भूमिका विरोधकांनी मांडली.

    पिंपरी-चिंचवड महापालिकेची जून महिन्याची सर्वसाधारण सभा आज आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. लॉकडाऊनमध्ये अडचणीत आलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना एकवेळी ३ हजार रुपयांची मदत जाहीर करुनही आयुक्तांच्या भूमिकेमुळे देता आली नाही. त्यामुळे भाजपची गोची झाली. भाजपला विरोधकांनीही घेरले आहे. त्यावरून सत्ताधारी भाजपने आयुक्तांवर हल्लाबोल केला. चर्चेला सुरुवात करताना भाजपचे राहुल जाधव म्हणाले, “आर्थिक दुर्बल घटकातील ४० हजार नागरिक आयुक्तांच्या भूमिकेमुळे मदतीपासून वंचित राहिले आहेत. आयुक्तांनी आम्हाला तोंडावर पाडले”.

    भाजपचे अंबरनाथ कांबळे म्हणाले, “मदतीच्या घोषणेमुळे लोक खूश झाले होते. पण, आयुक्तांनी गोड बोलून आम्हाला वेड्यात काढले. लोकांना फसविले. विरोधकांनी आमच्या विरोधात फलक लावलेत. आयुक्त राजकीय पक्ष काढणार आहेत का, असा संशय येतो. आमच्या विरोधात उमेदवार उभे करणार आहात का? आमचा कार्यक्रम करण्यासाठी आला आहात का? पानाला चुना लावल्यासारखा आम्हाला चुना लावला आहे. लोक आम्हाला पैसे मागतात. आयुक्त पैसे देत नसल्याचे फलक लावणार आहे. आयुक्तांच्या बंगल्यावर मोर्चा काढणार आहे. आयुक्तांना परत पाठविण्याचाही ठराव केला जाईल”.

    तांत्रिक कारण देत मदत नाकारण्यात येते

    भाजपचे विकास डोळस म्हणाले, “आयुक्त आणि प्रशासनाच्या वागण्यात विसंगती आहे. काय तरी हेतू मनात ठेवून प्रशासन काम करत आहे. आर्थिक संकटात शहरातील गोरगरीब नागरिकांना मदत करण्याची महापालिकेची नैतिकता आहे. आयुक्त तांत्रिक कारण देवून मदत नाकारत आहेत. प्रशासन केवळ स्वतःच्या हिताचे काम करण्यात दंग आहे”.

    आयुक्तांनी गोरगरिबांना मदतीपासून ठेवले वंचित

    भाजपच्या उषा मुंडे म्हणाल्या, “शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना ३ हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. पण, आयुक्तांनी कायद्यावर बोट ठेवून गोरगरिबांना मदतीपासून वंचित ठेवले. महापालिका नावाजलेली, अर्थिक सक्षम असतानाही का मदत करू शकत नाही?. आयुक्तांनी नागरिकांना जाणीवपूर्वक वंचित ठेवले. शहरवासीय आयुक्तांना माफ करणार नाहीत”.

    आयुक्तांवर बेछूट आरोप करणे अयोग्य : योगेश बहल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ  नगरसेवक योगेश बहल म्हणाले, “आयुक्तांनी थेट पैसे देता येतात की नाही हे तपासावे. आपत्तीच्यावेळी महापालिकेने वस्तू स्वरूपात मदत केली. गोरगरिबांना मदत मिळावी अशी सर्वांची मागणी आहे. पण, आजपर्यंत महापालिकेने व्यक्तिगत मदत केली नाही. त्यामुळे उगाच आयुक्तांवर बेछूटपणे आरोप करणे योग्य नाही. त्यांच्यावर बोलण्यात अर्थ नाही. यावर काही तोडगा काढता येईल का हे तपासावे”.

    आम्हाला बोलू न देणे हे शंकास्पद : राहुल कलाटे

    शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, “गोरगरिबांना ३ हजारऐवजी ५ हजार रुपये देण्याची आमची भूमिका आहे. सभेसमोर हा विषय आला असताना आम्हाला का बोलू दिले नाही हे शंकास्पद आहे. सर्वांशी चर्चा करून हा निर्णय भाजपने घेतला पाहिजे होता. कोणताही अभ्यास न करता भाजपने सवंग प्रसिद्धीसाठी घोषणा केली. कायद्यात बसून मदत करावी.