भाजपचा प्रसिद्धीसाठी स्टंट, गोरगरिबांची माफी मागावी; राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरे पाटील यांची मागणी

  पिंपरी : केंद्र सरकार, राज्य सरकार यांच्याकडून कोणतेही आदेश नसताना, नियमात आर्थिक मदतीची तरतूद नसताना आणि राज्यातील कोणत्याही महानगरपालिकेने असा निर्णय घेतलेला नसतानाही शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील गोरगरिबांना तीन हजार रुपये आर्थिक मदत करण्याची घोषणा पिंपरी-चिंचवडमधील सत्ताधारी भाजपने केली. प्रत्यक्षात नियमानुसार ही मदत करता‌ येत नसल्याने भाजपने हा प्रसिद्धी स्टंट करून शहरातील गोर गरिबांची फसवणूक केली. त्यासाठी शहरातील भाजप सत्ताधाऱ्यांनी शहरातील गोरगरिबांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

  सत्ताधारी भाजपने आर्थिक मदतीच्या नावाखाली गरिबांना फसविल्याचा आरोप करत संजोग वाघेरे‌ पाटील म्हणाले की, कोरोना संकटामुळे कडक लॉकडाऊन करून काही निर्बंध लादण्याचा कठोर निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला. त्यामुळे आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांना राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत अनेक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचली आहे. परंतु, राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर सतत बिनबुडाचे आरोप करून महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या भाजपने गोरगरिबांना सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवरून राजकारण केले. पिंपरी-चिंचवडमध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील नागरिकांना तीन हजार रुपये मदत करण्याची फसवी घोषणा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली. अशा पद्धतीने मदत करणारी राज्यातील पहिली महानगरपालिका म्हणून सत्ताधारी भाजपने मोठा प्रसिद्धी स्टंट केला.

  काही दिवसात ही मदत थेट खात्यात जमा होणार, म्हणून शहरातील गोरगरिबांना आशेला लावले. प्रत्यक्षात ही घोषणा करताना या पध्दतीने आर्थिक मदत करणे महानगरपालिकेला शक्य आहे किंवा कायद्यात तशी तरतूद आहे का, याचा कोणताही विचार भाजपने केला नाही. गल्ली ते दिल्ली जुमलेबाजी हे एकच धोरण मागच्या सात वर्षात भाजपने राबविले आहे. आश्वासने देऊन फसविण्याचे अनेक रेकॉर्ड भाजपने केले आहेत. त्या रेकॉर्डमध्ये पिंपरी-चिंचवड भाजपने आणखी भरच घातली आहे.

  भाजपचे खायचे अन् दाखवायचे दात वेगळे

  भाजपचे खायचे अन्‌ दाखवायचे दात वेगळे आहेत. हे शहरातील नव्हे, तर संपूर्ण देशातील नागरिकांना कळून चुकले आहे. तेच शहरातील गोरगरिब नागरिकांच्या बाबतीत त्यांनी केलेले आहे. परंतु स्वत:ची चूक कबूल करण्याची नैतिकता नसलेल्या भाजपने आता कांगावा सुरू केला आहे. या निर्णयाला ते आयुक्तांना दोष देत आहेत. राज्यातील इतर कोणत्या महानगरपालिकेने या पध्दतीने जुमलेबाजी केलेली नाही. तर आता महानगरपालिका अधिनियमानुसार या पध्दतीची कोणतीही थेट मदत करता येत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

  भाजपकडून गरिबांना आशेला लावण्याचे काम

  पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ताधारी भाजपने प्रसिध्दीसाठी गरिबांना आशेला लावण्याचे काम केले आहे. शहरातील या कष्टकरी, हातावर पोट असलेल्या वर्गाचा अपेक्षाभंग करून त्यांची फसवणूक करण्याचे पाप सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचे‌ उघड झाले आहे. “खोटं बोल, पण, रेटून बोल” हा अजेंडा असलेल्या भाजपचा पिंपरी-चिंचवडमध्ये बुरखा फाटला आहे. त्यामुळे शहरातील सत्ताधारी भाजपने गोरगरिबांची जाहीर माफी मागितली पाहिजे, असे संजोग वाघेरे पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.