भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल

नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्याच वेळी या आंदोलनाला पाठिंबा देत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली.

    पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी काल(गुरुवारी) पुण्यातील शास्त्री रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या या अघोषित आंदोलनात सहभागी झाल्याने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह वीस ते पंचवीस जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नियोजित एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक ठिकाणी संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलने केली होती. या आंदोलनाची सुरुवात पुण्यापासून झाली. त्याच वेळी या आंदोलनाला पाठिंबा देत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंदोलनाची तात्काळ दाखल घेत, फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आठ दिवसाच्या आता परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले. तसेच हे आंदोलन थांबवण्याचेही आवाहनही विद्यार्थ्यांना केले.

    मात्र मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला झुगारून पडळकर यांनी आजची रात्र रस्त्यावरच काढणार असल्याची भूमिका घेतली. पोलिसांनी अनेकदा विनंती करून देखील पडळकर आंदोलन स्थळ सोडत नाहीत हे लक्षात आल्यानंतर,शेवटी पडळकर यांना रात्री उशीरा विश्रामबाग पोलिस ठाण्यात उचलून नेण्यात आले तर विक्रांत पाटील, पुनीत जोशी, प्रदीप देसरडा, लक्षण हाके, अभिजित राऊत, संतोष कांबळे, धीरज घाटे यांच्यासह नऊ जणांना रात्री ताब्यात घेतले होते. त्यानंतर तेथे त्यांच्यावर व त्याच्या साथीदारांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांनी दिली.