sanjay kakade

महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले असले, तरी हा आकडा ५५० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. यात अनेक मोठे मासे आहेत. परंतु, ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे, त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडणे लाजीरवाणे आहे. कदाचित त्यांना या गोष्टींनी फरक पडत नसला, तरी महानगरपालिकेला आणि सामान्य जनतेला फरक पडतो.

    पुणे : महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची पाणीपट्टी थकविणाऱ्या ८५६ थकबाकीदारांची यादी मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. या यादीत अनेक आस्थापने, व्यक्ती व व्यावसायिकांचा समावेश असला, तरी महानगरपालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे संजय काकडे व नीलेश राणे या माजी खासदारांचा समावेश आहे. पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या बाजूने मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या संजय काकडे यांना थकलेली पाणीपट्टी भरण्याचीही तसदी घ्यावी वाटत नाही, हे जितके निषेधार्ह आहे, तितकेच लाजीरवाणेही आहे अशी टिका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

    ‘पार्टी विथ डिफरन्स’चा नारा देत सत्तेत आलेल्या भाजपने हा आपल्या नेत्यांना पाठीशी घालण्यात आणि सामान्य पुणेकरांकडील थकबाकी वसूल करण्यातच पुढे असल्याचा ‘डिफरन्स’पणा दाखवून दिला आहे अशी टीका जगताप यांनी केली. काकडे यांनी सुमारे ६६ लाख रुपयांची आणि राणे यांनी १७ लाख रुपयांच्या थकबाकीकडे जाणीवपूर्वक काणाडोळा केला आहे. वास्तविक, महानगरपालिकेने २०० कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले असले, तरी हा आकडा ५५० कोटी रुपयांच्या घरात असण्याची शक्यता आहे. यात अनेक मोठे मासे आहेत. परंतु, ज्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे, त्यांना आपल्या कर्तव्याचा विसर पडणे लाजीरवाणे आहे. कदाचित त्यांना या गोष्टींनी फरक पडत नसला, तरी महानगरपालिकेला आणि सामान्य जनतेला फरक पडतो. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे महानगरपालिकेकडून संजय काकडे व नीलेश राणे यांच्यावर कारवाई होईल का? असा प्रश्नही जगताप यांनी उपस्थित केला आहे.