महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा ठराव भाजपने नाकारला

पिंपरी - चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकुब सभा मंगळवारी (दि. ९) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

    पिंपरी : अर्थसंकल्पातील लोकहिताच्या योजनांबद्दल तसेच पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रोला मान्यता दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी मांडलेल्या ठरावावर सत्ताधारी भाजपने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्य सरकारचे अभिनंदन करणे टाळले. या अभिनंदन ठरावाला माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी विरोध केला.

    पिंपरी – चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी महिन्याची तहकुब सभा मंगळवारी (दि. ९) पार पडली. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला.

    गेल्या पाच वर्षांपासून शहरवासीयांची मागणी असलेल्या पिंपरी – चिंचवड ते निगडी कॉरिडॉर या मेट्रो मार्गिकेस राज्य मंत्रिमंडळाच्या १० फेब्रुवारी रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी ९४६ कोटी ७३ लाख एवढा खर्च येणार आहे. या मार्गिकेची लांबी ४.४१ किलोमीटर इतकी असून यात ३ स्थानके आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने मेट्रोला मान्यता मिळाली आहे.

    राज्याच्या अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजना जाहीर केल्या आहेत. आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यासाठी महापालिकेकरिता भरीव तरतूद केली आहे. राजमाता जिजाऊ गृह स्वामिनी योजना त्यांनी जाहीर केली आहे. १ एप्रिल २०२१ पासून नवीन घर घेताना घराची नोंदणी महिलेच्या नावाने केल्यास मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत देऊन येणार असल्याची घोषणा सरकारने केली. राज्य सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. त्यानिमित्त राज्य सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव विरोधी पक्षनेते मिसाळ यांनी मांडला. त्याला राष्ट्रवादीचे प्रवीण भालेकर यांनी अनुमोदन दिले. मात्र, या ठरावाला विरोध करत माजी सभागृह नेते एकनाथ पवार यांनी महाविकास आघाडीच्या कारभारावर टीका सुरू केली. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आक्षेप घेऊ लागले. त्यावर महापौर ढोरे यांनी पवार यांना खाली बसण्याची सूचना केली. त्यानंतर महापौरांनी अभिनंदन ठरावावर कोणताही निर्णय न घेता पुढील कामकाज सुरू केले. राज्य सरकारचे अभिनंदन करण्यास टाळाटाळ केली.