दौंड शहरात स्टॅम्प पेपरचा काळाबाजार, कृत्रिम तुटवडा ; निबंधकांकडे लेखी तक्रार

पाटस : दौंड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दौंड शहरात २० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतचे स्टॅम्प पेपरचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा निर्माण करून स्टॅम्प पेपरची जादा दराने विक्री करत असूूून गरीब जनतेची लूट करत काही परवानाधारक मुद्रांक विक्रेते स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची लेखी तक्रार मंगळवार (ता.२२) रोजी दुय्यम निबंधकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

पाटस : दौंड तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेऊन दौंड शहरात २० रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंतचे स्टॅम्प पेपरचा काळाबाजार व कृत्रिम तुटवडा निर्माण करून स्टॅम्प पेपरची जादा दराने विक्री करत असूूून गरीब जनतेची लूट करत काही परवानाधारक मुद्रांक विक्रेते स्वत:चे उखळ पांढरे करून घेत असल्याची लेखी तक्रार मंगळवार (ता.२२) रोजी दुय्यम निबंधकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

स्टॅम्प पेपर विकेत्यांच्या दुकानांतच झेरॉक्स, टायपिंगचे दस्ताऐवज बनवण्याची सक्ती लाभार्थ्यांकडून केली जात असल्याचे प्रकार घडत आहेत. स्टॅम्प पेपर मिळत नाही. नाव लिहून ठेवा दोन दिवसांनी येऊन चौकशी करा, तुमचा स्टॅम्प पेपर आलेला नाही, अशा उत्तरांनी मुद्रांक विकेत्यांनी स्थानिक जनतेला वेठीस धरले जाण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. गरीब जनता वगळता महत्त्वाच्या व्यक्तींना मात्र मुद्रांक सहज उपलब्ध होत आहेत.

दौंड शहरात स्टॅम्प पेपर मिळत नसल्याने लाभार्थ्यांना नाईलाजाने काळाबाजारात जादा भावाने खरेदी करावे लागत आहेत, स्टॅम्प पेपर असूनही ते देण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार निबंधक यांच्याकडे वारंवार केल्या जात आहेत. सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या दौंड तालुक्यातील खेडोपाडयात ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, शाळा, रस्ते, वीज, पाणी, तलाठी, डाक कार्यालय बँका, पतसंस्था व महा-ई-सेवा केंद्र आदी सुविधा पोहोचल्या आहेत. मात्र शासकीय कार्यालयांशी निगडीत प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र, अ‍ॅफिडेव्हीट आदी शासकीय कामकाजासाठी आवश्यक कोर्ट फी स्टॅम्प व स्टॅम्प पेपर मात्र मूद्रांक विकेत्यांकडे उपलब्ध होत नाही. त्याचा फायदा घेवून काही दलालांनी कोर्ट फी आणि स्टॅम्पची काळया बाजारात विक्री करून पैसे कमवण्याचा उद्योग जोरात चालवला आहे. याचा फटका गोरगरीब आदिवासी जनतेबरोबरच, शाळकरी विद्यार्थी, सामान्य नागरिकांना बसत आहे.

दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा गैरफायदा घेऊन दौंड तालुक्‍यातील काही मुद्रांक विक्रेते स्टॅम्पची काळ्या बाजाराने विक्री जोमात करत आहेत. १०० रुपयांचा स्टॅम्प १५० रुपयांना विकत असल्याने या प्रकाराची चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. दौंड शहरात सहा परवानाधारक स्टॅम्प विक्रेते आहेत, यामधील बहुतेक स्टॅम्प विक्रेते कार्यालयात परवाना क्रमांक, परवाना धारकांचे नाव, शिल्लक स्टॅम्प पेपरची माहिती दर्शनी भागात फलकावर दर्शविणे बंधनकारक असताना सर्व नियमाला धाब्यावर बसवून चढ्या भावाने स्टॅम्प पेपरची विक्री करत आहेत. दरम्यान, संबंधित प्रकरणाची योग्य प्रकारे तपासणी करून दोषींवर योग्य कारवाईची मागणी तक्रारदार ए. होले यांनी केली आहे, तसेच दुय्यय निबंधक यांनी स्टॅम्प विक्रेतांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास पुणे येथील सहजिल्हा निबंधक दीपक पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले.

स्टॅम्प पेपर विक्रेतांनी कार्यालयात परवाना क्रमांक, परवाना धारकांचे नावाचे फलक दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे, तसेच स्टॅम्प पेपरची नोंद वहीवर सविस्तर माहिती नोंद केली पाहिजे, स्टॅम्प पेपर विक्रेते अशोक गायकवाड यांची लेखी तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई केली जाईल.

- पी. शेलार , दुय्यम निबंधक, श्रेणी-१, दौंड शहर