अँटी फंगल इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री; ४ जण अटकेत

    पिंपरी : अँटी फंगल या साथीच्या आजारावरील इंजेक्‍शनची काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी चार जणांना गुंडा विरोधी पथकाने अटक केली आहे. ही कारवाई वाकड येथे सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

    गौरव जयवंत जगताप (वय ३१, रा. काळाखडक रोड, वाकड), अमोल अशोक मांजरेकर (वय ३९, रा. सूसरोड, पाषाण, पुणे), गणेश काका कोतमे (वय ३२, रा. जनता वसाहत, पुणे) आणि एक महिला आरोपी (वय २४, रा. ज्ञानदीप शाळेजवळ, पालांडे यांच्या घरी, रुपीनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर बसवराज (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्यावरही गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. भाग्यश्री अभिराम यादव (वय ४४, रा. धनकवडी, पुणे) यांनी सोमवारी (दि. ७) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, अँटी फंगल या साथीच्या आजारावर वापरण्यात येणारे D Liposomol Amphoteriein-B Injection या औषधाची विक्री करण्यासाठी काहीजण वाकड येथे येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यानुसार गुंडा विरोधी पथकाने सापळा लावून चार जणांना अटक केली. ऍन्टी फंगलवरील इंजेक्‍शनचे तीन नग आरोपींकडे मिळून आले. त्यांनी हे औषध काळ्या बाजारात विक्रीसाठी आणले होते. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी चौघांची धरपकड केली.

    ही कारवाई पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्‍त रामनाथ पोकळे, उपायुक्‍त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्‍त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकातील सहायक निरीक्षक हरीश माने, हजरत पठाण, गणेश मेदगे, शुभम कदम, राम मोहिते, विनोद तापकीर यांच्या पथकाने केली आहे.