लस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान शक्य ! संसर्गामुळे रक्तदान चळवळीवर प्रतिकूल परिणाम ; नवे दिशानिर्देश जारी

कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन डोसमधील कालावधीही २८ दिवसांचा असल्याने पहिला आणि नंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेणारे नागरिक तब्बल ५६ दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन - तीन महिन्यांपासून देशभरात व पर्यायाने राज्यातही मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. या दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासानुसार लशीचा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनीही रक्तदान करणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  पिंपरी : कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर रक्तदान करण्यावर मर्यादा होत्या. केंद्र शासनाने लशीचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करू नये, याबाबत दिशानिर्देश दिले होते. मात्र, आता त्या संदर्भात अभ्यासाअंती हा कालावधी घटवून आता लसीकरणानंतर १४ दिवसांनी रक्तदान करणे शक्य होणार आहे. त्याबाबतचे नवे दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत.

  रक्तदानाबाबत समाजात बऱ्यापैकी जनजागृती झाली असली तरी गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे रक्तदान चळवळीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. पहिल्या लाटेपेक्षा कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत त्याचा तीव्रतेने अनुभव आला व रक्ताचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवला. त्यातच १६ जानेवारीपासून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रटलाइन वर्कर, दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील नागरिक आणि तिसऱ्या टप्प्यात आधी सहव्याधी असलेले ४५ वर्षांवरील लोक आणि नंतर ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस देणे सुरू झाले. राज्यांनी पुढाकार घेतल्यानंतर १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर रक्तदानावर त्याचा परिणाम अधिक झाला.

  कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करू नये, असे निर्देश आरोग्य मंत्रालयाकडून सुरवातीला आले. कोरोना संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर रक्तदान करावे, त्यापूर्वी रक्तदान करू नये, असे राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषदेने सूचित केले होते. लस घेतल्यानंतर काही जणांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे दिसून येतात. या कारणास्तव हे निर्देश देण्यात आले होते. प्रत्येक देशामध्ये देण्यात येणाऱ्या लसींचा गुणधर्म हा कोरोना संसर्गाला प्रतिबंध करणारा असला तरीही लसीतील प्रतिबंध करणाऱ्या विषाणूची सक्रियता वेगवेगळी असते. त्यामुळे काही देशांत रक्तदान करण्याचा कालावधी हा १४ तर काही ठिकाणी तो २८ दिवसांचा निश्चित करण्यात आला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते २८ दिवसांनंतर रक्तदान करणे योग्य आहे. कारण लस घेतल्यानंतर शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होत असते. अ‍ॅण्टीबॉडीज तयार होत असताना रक्तदान करणे कितपत सुरक्षित आहे, यावरही मतमतांतरे आहेत.

  कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन डोसमधील कालावधीही २८ दिवसांचा असल्याने पहिला आणि नंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेणारे नागरिक तब्बल ५६ दिवसांपर्यंत रक्तदान करू शकत नव्हते. त्यामुळे गेल्या दोन – तीन महिन्यांपासून देशभरात व पर्यायाने राज्यातही मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. या दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या अभ्यासानुसार लशीचा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनीही रक्तदान करणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नॅशनल ब्लड ट्रान्सफ्युजन काऊन्सिलने (एनबीटीसी) नवे परिपत्रक जारी केलं आहे. त्यात कोरोना लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याचा कालावधी बदलण्यात आला आहे.या परिपत्रकानुसार कोरोना लस घेतल्यानंतर २८ नाही तर १४ दिवसांनी तुम्ही रक्तदान करू शकता. रक्ताचा तुडवडा लक्षात घेता केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मार्चमध्ये कोरोना लसीकरणानंतर रक्तदान करण्याचा कालावधी २८ दिवस ठेवला होता. पण आता रक्तदान करणाऱ्या बहुतेक वयाच्या व्यक्ती कोरोना लस घेणार आहेत. त्यामुळे तज्ज्ञांशी चर्चा करून हा कालावधी कमी करण्यात आल्याचे ‘एनबीटीसी’ने स्पष्ट केले आहे. कोणत्याही कोरोना लशीचा प्रत्येकी डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रक्तदान करता येणार आहे.

  '' आरोग्य मंत्रालयाने नवे निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र राज्य रक्तसंक्रमण परिषदेनेही याबाबत सूचना आणि मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे रक्तदानाचा कालावधी घटल्याने आता ज्यांनी लस घेऊन १४ दिवस झाले त्यांनाही रक्तदान करणे शक्य आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन रक्तदान करावे''.

  - डॉ. शंकर मोसलगी, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, पिंपरी - चिंचवड महापालिका