गांजा जप्तीप्रकरणी दोघे आरोपी फरारी

चौघांच्या कोठडीत वाढ
बारामती : उंडवडी (ता. बारामती) येथील ४७ लाख रुपये गांजा जप्ती प्रकरणातील चार आरोपींना येथील अप्पर जिल्हा न्यायाधीश आर आर राठी यांनी (दि.१) ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन आरोपी अद्याप फरार आहेत. पाटस- बारामती रस्त्यावर उंडवडी येथील ड्रायव्हर ढाब्याजवळ (दि.२०) बारामती तालुका पोलिसांनी ही कारवाई केली होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहध्य्विजय कणसे (वय २६, रा. कानरवाडी, ता. कडेगाव, जि. सांगली), विशाल राठोड (वय १९, रा. नागेवाडी, जि. सांगली), नीलेश चव्हाण (वय ३२, रा. आंधळी, ता. माण, जि. सातारा), योगेश भगत (वय २२, रा. साबळेवाडी, शिर्सूफळ, ता. बारामती), दीपक ऊर्फ विनोद खालकर (रा. संगमनेर, जि. नगर), सागर थोरात (रा. सोनगाव, ता. बारामती) यांचा समावेश आहे. यातील खालकर व थोरात अद्याप फरार आहेत. अन्य चौघांना कारवाईवेळीच अटक केली होती. त्यांची पोलीस कोठडी (दि. २५) संपली. त्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयापुढे हजर केले असता (दि.१) ऑक्‍टोबरपर्यंत कोठडी वाढविली आहे.

-५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींकडून पोलिसांनी सुमारे ४७ लाखांच्या गांजासह १० लाखांचा टेम्पो असा ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला होता. आरोपींनी गांजा आंध्रप्रदेशातून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले. खालकर व थोरात यांनी बोलेरो गाडीद्वारा टेम्पोला रस्ता दाखविण्यास मदत केली. या प्रकरणात आणखी काही सूत्रधार आहेत का, याबाबत नेमका तपास व्हावा यासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवावी, असा युक्‍तिवाद सरकारी वकील अॅड. स्नेहल नाईक- बडवे यांनी केला. तो ग्राह्य धरत कोर्टाने आरोपींच्या कोठडीत वाढ केली.