खरेदी केला लॅपटॉप हातात मिळाली टाइल

पुण्यातील व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक पुणे : एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तींनं एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून लॅपटॉप खरेदी केला. मात्र, घरी आलेलं पार्सल

पुण्यातील व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक
पुणे :
 एका व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्यक्तींनं एका ऑनलाइन शॉपिंग पोर्टलवरून लॅपटॉप खरेदी केला. मात्र, घरी आलेलं पार्सल उघडल्यानंतर त्यात टाइल (फरशी) निघाली. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच संबंधित व्यक्तीनं देहूरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील तळवडे येथील ३६ रहिवाशी चिन्मय गिरीश मधोळकर यांनी एका नावाजलेल्या ऑनलाइन शॉपिंग साईटवरून प्रसिद्ध कंपनीचा लॅपटॉप खरेदी केला. त्यासाठी त्यांनी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ३७ हजार ९९० रुपयेही भरले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी लॅपटॉपची ऑर्डर दिली. २९ मे रोजी साधारण सकाळी ११ वाजता डिलिव्हरी घेऊन एक व्यक्ती आली. त्याने पार्सल चिन्मय मधोळकर यांच्याकडे सुपूर्द केलं. मधोळकर आणि त्यांच्या पत्नीला पार्सल उघडल्यानंतर धक्काच बसला.
पार्सलमध्ये लॅपटॉप नव्हे, तर लाल रंगाची टाइल निघाली. त्यानंतर मधोळकर यांनी शॉपिंग साईटशी संपर्क केला. लॅपटॉपऐवजी त्यांना टाइल मिळाल्याची तक्रार त्यांनी कंपनीकडे केली. पण, ‘आम्ही लॅपटॉप पाठवला होता,’ असं त्यांना शॉपिंग कंपनीकडून सांगण्यात आलं. त्यानंतर मधोळकर यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.