थोपटेवाडीत भरवली बैलगाडा शर्यत; पोलिसांच्या कारवाईत दहा बैलगाड्यांसह १२ दुचाकी जप्त

    निरा : थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथे एका माळरानावर बेकायदा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी यावर कारवाई करून दहा बैलगाडे व बारा दुचाकी जप्त केल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशाचे भंग करून या शर्यती भरवण्यात आल्याने पोलिसांकडून तिघा आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी (दि.१३) थोपटेवाडी आणि गुळूंचे या दोन गावांच्या सीमेवर असलेल्या माळावर येथे बैलगाडा शर्यती सुरू असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांना मिळाली होती. यानुसार थोपटेवाडी येथील बोलाईदेवीच्या पायथ्या लागत असलेल्या माळरानावर पोलीस उपनिरीक्षक गोतपागर, सहाय्यक फौजदार सुरेश गायकवाड, पोलिस नाईक राजेंद्र भापकर, संदिप मोकाशी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव, हरिश्चंद्र करे, पोलीस मित्र रामचंद्र कर्णवर व होमगार्ड हे खाजगी वाहनाने या माळरानावर गेले. तेथे काही लोक जमलेले दिसले. बैलगाडा शर्यत सुरू असल्याचे त्यांना आढळून आले. पोलिस गाडी आल्याचे पाहून बैल आणि बैलगाडे तिथेच सोडून लोकांनी तेथून पळ काढला.

    पोलिसांना त्याठिकाणी दहा बैलगाडे व १२ दुचाकी आढळून आल्या आहेत. पोलिसांनी सर्व बैलगाडे व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. जेजुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी घटनास्थळी भेट दिली. आयोजकांवर गुन्हा दखल करण्यात येत आहे. पिंपरे येथील अजय रखपासरे यांच्यासह आणखी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर आयोजकांसह जागा मालकाचीही चौकशी करून कारवाई करणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यानी सांगितले.