Cannabis
Cannabis

    वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवित्री ते कोलवाडी दरम्यान पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने गांजाची तस्करी करणार्‍या वाहनास पाठलाग करून पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि. १९) करण्यात आली.
    एलसीबीचीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलसीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदार राजेंद्र थोरात, प्रकाश वाघमारे, मुकुंद कदम, दत्तात्रय जगताप, पोहवा सचिन घाडगे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, प्राण येवले हे पुणे ते मुंबई रोडने पेट्रोलिंग करीत असताना ते कामशेत पोलीस स्टेशनचे हद्दीतील गोवित्री गावाजवळ आले असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, गोवित्री ते कोलवाडी दरम्यान एका चारचाकी वाहनांमधून गांजा विक्रीसाठी आणला जात आहे. या मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने LCB पथकाने कामशेतचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार, पोलीस हवालदार अजय दरेकर यांचे मदतीने बंदोबस्त लावला होता.
    यावेळी एक पांढऱ्या रंगाची कार (MH 12 GH 4173) नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व रहदारीचे नियमाकडे दुर्लक्ष करून जोरात कोलवाडीच्या बाजूकडे जाताना दिसली. त्या चालकाची हालचाल संशयास्पद वाटल्याने व मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे गाडीची खात्री पटल्याने सदर वाहनास अडथळा आणून पकडले व गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 25 किलोग्रॅम गांजा मिळून आला आहे.
    गाडीतील 2 जणांपैकी गाडीचालक व मालक संजय मोहिते (रा. गोवित्री ता.मावळ) हा पळून गेला असून, दुसरा व्यक्ती सनिल भाऊ केदारी (रा.कोलवाडी ता. मावळ जि. पुणे) याला मुद्देमालसह ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला कामशेत पोलीस ठाण्यात आणून योग्य ती कायदेशीर प्रक्रिया करून गुन्हा नोंद करण्यात आला.
    त्याच्याकडून 3 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमालसह गांजा व अंदाजे 10 लाख रुपये किमतीची कार असा एकूण 13 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. हा आरोपी सराईत असून, त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याचे घनवट व जगताप यांनी सांगितले. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्याचे निरीक्षक जगताप हे तपास करित असून, फरार मोहिते याचा शोध सुरू आहे.